Sangli: डोर्ली फाट्यानजीक निवृत्त सुभेदाराचा खून, कारण अस्पष्ट; मोटार घेऊन संशयित फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:14 PM2024-09-27T18:14:48+5:302024-09-27T18:15:06+5:30
तासगाव : तासगाव तालुक्यातील डोर्ली फाटा येथे लष्करातील निवृत्त सुभेदार गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५, रा. बलगवडे) यांचा लोखंडी ...
तासगाव : तासगाव तालुक्यातील डोर्ली फाटा येथे लष्करातील निवृत्त सुभेदार गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५, रा. बलगवडे) यांचा लोखंडी सळईने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. बुधवारी रात्री घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
मृत गणपती शिंदे हे लष्करातील निवृत्त सुभेदार होते. नवी डोर्ली फाट्यालगत बलगवडे हद्दीतील शेतात त्यांचे घर आहे. घरात ते एकटेच वास्तव्यास होते. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त परगावी राहतात. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शेजाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शिंदे यांना हाक मारली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. घराचे दरवाजेही उघडे दिसल्याने आत डोकावून पाहिल्यानंतर शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिस पाटील हनुमंत पाटील यांना दिली. हनुमंत पाटील यांनी तासगाव पोलिसांना कळविल्यानंतर उपाधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक साेमनाथ वाघ, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर लोखंडी सळईने मारहाण करून निर्घृणपणे खून केल्याचे दिसून येत होते. खुनानंतर संशयित शिंदे यांची माेटार घेऊन फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. तासगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांना तपासाबाबत सूचना केल्या. संशयिताच्या तपासासाठी पथके रवाने रवाना करण्यात आली. खुनानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. याबाबत मृत गणपती शिंदे यांचा मुलगा अमित गणपती शिंदे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.