मिरजेत निवृत्त कर्मचाऱ्यांचा रेल रोकोचा प्रयत्न, आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट
By शरद जाधव | Published: December 20, 2023 05:51 PM2023-12-20T17:51:20+5:302023-12-20T17:52:02+5:30
मिरज : विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मिरज रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केल्याने ...
मिरज : विविध मागण्यांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मिरजरेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलिस व आंदोलकात जोरदार झटपट झाली.
ईपीएफ पेन्शनर संघाची अखिल भारतीय समन्वय समिती, सर्व श्रमिक संघटनेतर्फे केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सांगली, सातारा व कोल्हापुरातील विविध विभागातील निवृत्त कर्मचारी सहभागी होते. देशभरात ७५ लाख निवृत्ती वेतनधारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. केंद्र सरकारचे धोरण निवृत्ती वेतनधारकांच्या विरोधात आहे. भविष्य निर्वाह निधीतही पेन्शनरांची फसवणूक होत असल्याचा निवृत्त कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
पेन्शन फंडावर मिळणाऱ्या व्याजापैकी केवळ २५ टक्के रक्कम पेन्शनरना दिली जात आहे. शंभर टक्के रक्कम दिल्यास प्रत्येक पेन्शनरला दरमहा ५८०० रुपये पेन्शन मिळेल, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. किमान नऊ हजार रुपये पेन्शन, महागाई भत्ता, प्रवासात सवलत, स्वस्त राशन, मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, केंद्र सरकारचा २०१४ चा ठराव रद्द करावा, पेन्शन हिशेबाची पद्धत बदलावी, ११/४ कलम रद्द करून पूर्ण वेतनावर पेन्शन मिळावी. पेन्शन फंडाचे खासगीकरण थांबवावे. पेन्शन योजनेवर श्वेतपत्रिका जारी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी मिरज रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन जाहीर करण्यात आले होते.
मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला. मिरज रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. यावेळी आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसून मैसूर - अजमेर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवल्याने आंदोलक पोलिसांची जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना रेल रोको करू दिला नाही. आंदोलकांनी जोरदार घोषणा देत रेल्वे स्थानक दणाणून सोडले.
आंदोलनात गोपाळ पाटील, भाऊसाहेब यादव, अशोक कदम, तुकाराम पाटील, महादेव देशमुख, दीपक कांबळे, अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, नाना जगताप, रवी साळुंखे, शंकर पाटील यांच्यासह एसटी, सहकारी बँका, सहकारी सूतगिरणी, सहकारी साखर कारखान्यासह विविध विभागातील निवृत्त कर्मचारी सहभागी होते.