निवृत्त पाेलीस हवालदाराची पत्नी-मुलासह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:11 AM2021-01-24T04:11:38+5:302021-01-24T04:11:38+5:30
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णासाहेब यांचा ...
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अण्णासाहेब यांचा मुलगा महेश गव्हाणे शेअर बाजारात गुंतवणूक करीत हाेता. काही जणांकडून पैसे घेऊन त्याने लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती; मात्र शेअरमध्ये नुकसान झाल्याने कर्ज झाले होते. कर्जफेडीसाठी अण्णासाहेब गव्हाणे यांना मिरजेतील घरही विकावे लागले होते. गुंतवणुकीसाठी रक्कम देणाऱ्यांनी वसुलीचा तगादा लावल्याने पंधरा दिवसांपूर्वी महेश फेसबुकवर पोस्ट लिहून अंकलीस कृष्णा नदीत आत्महत्या करण्यासाठी गेला होता. त्यावेळी कुटुंबीय व मित्रांनी त्याला आत्महत्येपासून रोखले होते; मात्र शनिवारी पहाटे महेशसह वडील अण्णासाहेब व आई मालन यांनीही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. शेअर बाजारातील गुंतवणुकीत झालेला तोटा व वसुलीसाठी सावकारांच्या तगाद्यामुळे तिघांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.
अण्णासाहेब गव्हाणे सहा वर्षांपूर्वी हवालदार पदावरून पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. मुलगा महेशने अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर शेअर बाजारात गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू केला होता. काही काळ त्याने चहाचा व्यवसायही केला होता. शेअर बाजारातील गुंतवणुकीत तोटा झाल्यामुळे देणी थकली हाेती. यामुळे गेले महिनाभर सावकारांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला होता. यामुळे तणावात असलेल्या गव्हाणे कुटुंबाने शनिवारी मध्यरात्री घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे तीन वाजता महेश याचा व्हॉट्सॲपचा लास्ट सीन आहे.
शनिवारी सकाळी गव्हाणे यांचा दरवाजा उघडला नसल्याने आठ वाजता शेजारी राहणाऱ्या त्यांच्या पुतण्याने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर घरात तिघांनीही आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी महेश याला शेअर बाजारात गुंतवणुकीत झालेल्या तोट्यामुळे सावकारांसह १३ जणांच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत १३ जणांची नावेही लिहिली आहेत. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत सावकारी कर्ज देऊन तिघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
फाेटाे : १३०१२०२१ अण्णासाहेब गव्हाणे
फाेटाे : १३०१२०२१ मालन गव्हाणे
फाेटाे : १३०१२०२१ महेश गव्हाणे