जिल्ह्यात चारशेवर कर्मचारी निवृत्त
By admin | Published: May 31, 2016 11:42 PM2016-05-31T23:42:12+5:302016-06-01T00:57:17+5:30
एक जून जन्मतारीख : शासकीय कार्यालयात कामाचा ताण वाढणार
सांगली : शासकीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भावनिक क्षण म्हणजे सेवानिवृत्तीचा दिवस. जिल्ह्यात दि. ३१ मे रोजी (मंगळवार) तब्बल चारशेहून अधिकारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. पूर्वी कुटुंबात जन्मतारखेच्या नोंदी ठेवण्याची पध्दत नसल्याने किंवा निरक्षणपणामुळे अनेकांना लागलेल्या ‘सरकारी’ एक जून या जन्म दिनांकामुळेच ३१ मे या एकाचदिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विलास डुबल, महापालिकेचे उपायुक्त सी. बी. चौधरी, उद्योग भवनचे महाव्यवस्थापक कांबळे यांचा समावेश आहे.
प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती हा मोठा समाधानाचा क्षण असतो. नेहमीच फायलींच्या गराड्यात राहिलेल्यांना यामुळे कायमची उसंत मिळत असते, तर अनेकजण आयुष्याची ‘सेकंड इनिंग’ सुरू करत असतात. वर्षभर सेवानिवृत्तीची प्रक्रिया सुरूच रहात असली तरी, ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या मात्र नेहमीच मोठी असते. यंदाही जिल्ह्यातील विविध विभागातील चारशेहून अधिक कर्मचारी निवृत्ती घेत आहेत. यात सर्वाधिक प्राथमिक शिक्षकांचे प्रमाण असून, त्यानंतर एसटीचे कर्मचारी, वीज वितरण कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पूर्वी जन्मदिनांक लिहून ठेवली जात नसे. त्यात सर्वसामान्य घरांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण असल्याने जन्म तारखेचे भविष्यकालीन महत्त्व माहीत नसल्याने कदाचित अंदाजे तारखेवरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात असे. यातही जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने त्याकाळी बहुतांशजणांची जन्मतारीख १ जूनच शाळा दप्तरी लागली आहे. यामुळेच ३१ मे रोजी निवृत्तीचे प्रमाण अधिक आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये एसटीचे १०५ कर्मचारी निवृत्त होत असून, यात ३२ चालक, २२ वाहक, १६ कार्यशाळा कर्मचारी आणि ३५ प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा आहेत. जिल्हा परिषदेचे ८९ कर्मचारी निवृत्त होत असून, यात शिक्षणच्या सर्वाधिक ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधील १४ कर्मचारी निवृत्त झाले असून, त्यात दोन नायब तहसीलदार, १० मंडल अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेचेही १८ कर्मचारी निवृत्त झाले असून, त्यात उपायुक्तांसह लिपिक, घरपट्टी, पाणी पुरवठासह ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात वर्ग चारच्या ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मंगळवारी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी विविध विभागात सत्कार कार्यक्रमांचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)
महापालिकेची ६२६ पदे रिक्त
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत एकूण २ हजार ३७७ पदे मंजूर आहेत. यापैकी ६0८ पदे यापूर्वी रिक्त होती. या १८ रिक्त पदांमुळे आता ही संख्या ६२६ वर गेली आहे. महापालिकेत सध्या १ हजार ७५१ जण कार्यरत आहेत. रिक्त पदांची संख्या वाढत असल्याने दिवसेंदिवस प्रत्येक विभागात कामाचा ताण वाढत आहे. निवृत्त झालेल्या १८ कर्मचाऱ्यांचा सत्कार मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या सभागृहात आयुक्त अजिज कारचे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष पाटील, नगरसेविका संगीता खोत, माजी नगरसेवक वि. द. बर्वे उपस्थित होते.