हक्काच्या पेन्शनसाठी सेवानिवृत्त शिक्षक आक्रमक, पाच तारखेपर्यंत पेन्शन जमा करण्याची मागणी, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 06:58 PM2021-11-22T18:58:15+5:302021-11-22T18:59:43+5:30
pension News: हक्काची पेन्शन महिना- दोन महिन्यानंतर मिळत असल्याने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पेन्शन महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत जिल्हा व महापालिका प्रशासनाने खात्यावर वर्ग करावी, यासाठी शिक्षक आक्रमक झाले होते.
सांगली : हक्काची पेन्शन महिना- दोन महिन्यानंतर मिळत असल्याने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पेन्शन महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत जिल्हा व महापालिका प्रशासनाने खात्यावर वर्ग करावी, यासाठी शिक्षक आक्रमक झाले होते. सोमवारी महापालिका, जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
वेळेवर पेन्शन जमा न झाल्यास अधिकार्यांना घेरावो घालण्याचा इशारा राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी दिला. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने महापालिका व जिल्हा परिषदेवर मोर्चाचे आयोजन केले होते, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्रिकोणी बागेत मेळावा घेण्यात आला. यावेळी विश्वनाथ मिरजकर म्हणाले, जिल्हा परिषद व महापालिका क्षेत्रात सात हजार प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना महिन्याच्या 20 ते 22 तारखेला पेन्शन मिळते. यामुळे वयोवृध्द सेवानिवृत्त शिक्षकांचे हाल सुरू आहेत. वारंवार मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष केले जाते. महापालिकेला वेतनसाठी पन्नास टक्के रक्कम स्वत:ची घालावी लागते, तर पन्नास टक्के शासनाकडून रक्कम येते. त्यामुळे महापालिका रक्कम देण्यास विलंब करते. अधिकार्यांनी कारणे सांगू नयेत. महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत त्यांनी खात्यावर पेन्शन वर्ग करावी. जिल्हा परिषदेने इतर सरकारी कर्मचार्यांच्या वेतनाबरोबर सेवानिवृत्त शिक्षकांच्या खात्यावर पेन्शन वर्ग करावी, अन्यथा अधिकार्यांना घेरावो घालण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व महापालिकेच्या प्राथमिक शिक्षक मंडळाच्या अधिकार्यांना मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने दिले. महापालिका कार्यक्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षकांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील फरक तातडीने मिळावा, पेन्शनधारकांना ओळखपत्र मिळावे, सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन, ग्रॅज्युएटीची रक्कम विनाविलंब अदा करावी, सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शन कार्यालयाची तळमजल्यावर व्यवस्था करावी, आदी मागणी करण्यात आल्या. यावेळी स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबुराव सरडे, पा. बा. पाटील, संपतराव चव्हाण, बिलाल माशालकर, संपतराव चव्हाण, मारूती कांबळे, सुरेंद्र पेंडुळकर, महादेव झांबरे, ताजुद्दीन मुलाणी, गणपती शिंदे, भानुदास पाटील, अंजली कमाने, सुरेखा मिरजकर, शंकर पाटील, सुभाष माळी, बाहुबली मोगलांडे, अशोक पवार, किरण गायकवाड, बाबासाहेब लाड, शशिकांत भागवत, सयाजीराव पाटील, यु.टी.जाधव आदी सहभागी झाले होते.