सांगलीत निवृत्त शिक्षकाला दीड कोटीचा गंडा, सहा जणांवर गुन्हा दाखल
By शीतल पाटील | Published: October 25, 2023 03:45 PM2023-10-25T15:45:53+5:302023-10-25T15:47:43+5:30
सांगली : जादा परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला तब्बल १ कोटी ४६ लाख ७६ हजार ९०२ रुपयांचा ...
सांगली : जादा परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला तब्बल १ कोटी ४६ लाख ७६ हजार ९०२ रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना २१ मे ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेश शंकर जोशी ( रा. विश्रामबाग, सांगली ), राहुल बाळासाहेब चव्हाण (रा. लक्ष्मी छाया डेंटल नजीक, प्रांत कार्यालयाजवळ, किल्ला भाग, मिरज ), सौरभ ओमप्रकाश शर्मा (रा. कट्टारी मराका मोहल्ला, पंखा जोतवारा, जयपूर, राजस्थान ), राजेंद्र शशिकांत खांडेकर ( रा. इंदोर, मध्यप्रदेश ), जमीर अली (रा. जयपूर, राजस्थान ), अजित जयपाल पाटील (रा. मिरज बोलवाड रस्ता, टाकळी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. आयुब अल्लाबक्ष मिरजे ( रा. कोरे कॅपिटल, पोलीस मुख्यालयासमोर, विश्रामबाग, सांगली ) यांनी फिर्याद विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहा संशयितांनी सेवानिवृत्त शिक्षक आयुब मिरजे यांच्याशी मैत्री केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यावर त्यांना जादा परताव्याचे आमिष दाखविले. आरेंच्युअर या कंपनीची भारतातील शाखा आर्मस इंटरनॅशनल पुणे या कंपनीत गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत अधिक परतावा मिळत असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह धरला. फिर्यादी मिरजे यांनी विश्वास ठेवून संशयीतांनी सांगितल्याप्रमाणे २ कोटी १४ लाख ८७ हजार २०० रुपयांची गुंतवणूक केली.
संशयितांनी काही कालावधीनंतर फिर्यादी मिरजे यांना परतावा म्हणून ६७ लाख ५९ हजार ६४८ रुपयांची रक्कम दिली. मात्र त्यानंतर परतावा मिळाला नाही. ही बाब मिरजे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुद्दलाची रक्कम परत मागितली. मात्र त्यास टाळाटाळ होवू लागली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे मिरजे यांच्या लक्षात आले. त्यानंतर काल, मंगळवारी (दि. २४) फिर्यादी मिरजे यांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.