सांगलीतील निवृत्त शिक्षक हनीट्रॅपमध्ये अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:22+5:302021-08-01T04:25:22+5:30
चिकोडी येथील एका महिलेने निवृत्त शिक्षक पाटील यांच्याशी सोशल मीडियावर मैत्री केली. दोघांचे चॅटिंग सुरू झाल्यानंतर महिलेने पाटील यांना ...
चिकोडी येथील एका महिलेने निवृत्त शिक्षक पाटील यांच्याशी सोशल मीडियावर मैत्री केली. दोघांचे चॅटिंग सुरू झाल्यानंतर महिलेने पाटील यांना तिची छायाचित्रे पाठवली. पाटील यांनीही स्वत:ची छायाचित्रे महिलेस पाठविली. त्यानंतर महिलेचा पती आहे, असे सांगणाऱ्या चिदानंद कुंभार याने पत्नीस आक्षेपार्ह छायाचित्र पाठविल्याबद्दल विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पाटील यांना बदनामीची धमकी दिली.
कुंभार याने यावेळी सात लाख रुपयांची मागणी केली. पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध कर्नाटकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पाटील यांनी कुंभार यास पाच हजार रुपये दिले. मात्र चिदानंद कुंभार व कवठेमहांकाळ येथील एका संघटनेचा पदाधिकारी उत्तम सुतार या दोघांनी पाटील यांच्या पत्नीस वारंवार फोन करून प्रकरण मिटविण्यासाठी मिरज बसस्थानकावर बोलावले. दोघांनी सात लाखांची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर श्रीपाद पाटील यांनी याबाबतची तक्रार गांधी चाैक पोलिसांत दिली. चिदानंद कुंभार व उत्तम सुतार या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.