कालबाह्य मका बियाणे कंपनीकडे परत
By admin | Published: June 28, 2015 12:32 AM2015-06-28T00:32:39+5:302015-06-28T00:33:38+5:30
जमदाडे यांची माहिती : प्रयोगशाळेत होणार साठ्याची तपासणी, तणनाशकाच्या चौकशीचे आदेश
सांगली : जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कालबाह्य झालेल्या मका बियाणांचे वाटप आता थांबवण्यात आले असून, शिल्लक असलेले सुमारे शंभरहून अधिक क्विंटल बियाणे परत कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. तणनाशक वाटपाच्या सखोल चौकशीचेही आदेश दिले असून, चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी दिला आहे.
तासगाव तालुक्यामध्ये मागीलवर्षी आलेल्या व कालबाह्य झालेल्या बियाणांची विक्री झाली. त्याचबरोबर गेल्यावर्षी मोफत वाटलेल्या तणनाशकासाठी यावर्षी शंभर रुपये घेऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचा उद्योगही खुलेआम कृषी विभागात सुरू झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर याची कृषी विभागाने गंभीर दखल घेतली. याबाबत कृषी अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठकही झाली. तासगाव तालुक्यात महाबीज कंपनीचे ९ क्विंटल मका बियाणे शिल्लक असून, जिल्ह्यात सुमारे शंभर क्विंटल बियाणे शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे.
हे बियाणे आता महाबीज कंपनीकडे परत पाठविण्यात आले आहे. तसे आदेशही कंपनीला देण्यात आल्याची माहिती जमदाडे यांनी दिली. या बियाणांसोबतच ‘अट्रानेक्स’ या नावाचे अर्धा किलोचे तणनाशक मोफत देण्यात आले होते; मात्र त्याची शंभर रुपयाला विक्री करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी होत असून याबाबचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले मका बियाणे १८ एप्रिल २०१५ रोजीच कालबाह्य झाले आहे. तासगाव तालुक्यात ६६ हेक्टरवर सध्या मका बियाणांची पेरणी झाली आहे. यात मोठ्या प्रमाणावर कालबाह्य झालेली बियाणे आहेत. मुदत संपलेल्या मका बियाणांचा आणि मोफत असूनदेखील तणनाशकाची पैसे घेऊन विक्री करण्याचा प्रकार कृषी विभागात सुुरू होता. ‘लोकमत’मध्ये आलेल्या वृत्तानंतर याचे वितरणही तात्काळ थांबवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)