सांगलीतील पूरग्रस्त घरी परतले, घरातील चिखलगाळ काढण्यास सुरुवात

By अविनाश कोळी | Published: August 8, 2024 07:17 PM2024-08-08T19:17:59+5:302024-08-08T19:18:34+5:30

महापालिकेकडून औषध फवारणी

Returned to the flood affected house in Sangli, started cleaning the house | सांगलीतील पूरग्रस्त घरी परतले, घरातील चिखलगाळ काढण्यास सुरुवात

सांगलीतील पूरग्रस्त घरी परतले, घरातील चिखलगाळ काढण्यास सुरुवात

सांगली : पूर ओसरताच निवारा केंद्रातून तसेच नातेवाइकांच्या घरातून पूरग्रस्त नागरिक बुधवारी त्यांच्या घरी परतले. घरात इंचभर साचलेला चिखल-गाळ, अंगणात पडलेला कचरा अन् भिजलेले साहित्य स्वच्छ करण्यात आता पूरग्रस्त व्यस्त झाले आहेत. गुरुवारी पूर ओसरलेल्या भागात नागरिकांची स्वच्छता कामासाठी लगबग सुरू होती.

बारा दिवसांपासून ठाण मांडून असलेला पूर बुधवारी पहाटे ओसरला. पाणी नदीपात्रात गेल्यानंतर महापालिकेने सुरुवातीला पूर ओसरलेल्या भागात स्वच्छता केली. निवारा केंद्रातील नागरिकांना एक दिवस थांबण्याची सूचना केली. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून पूरग्रस्त नागरिक घरी परतू लागले. दोन हजारावर पूरग्रस्त नागरिकांनी स्थलांतर केले होते. हे सर्व नागरिक आता घरी परतले आहेत. अनेकांनी साहित्यासह स्थलांतर केले होते, तर काही नागरिकांनी साहित्य बांधून घरातच वरच्या बाजूस ठेवून स्थलांतर केले होते. घरी परतल्यानंतर स्वच्छता व साहित्य पूर्ववत ठेवण्याची त्यांची लगबग सुरू झाली.

..या भागातील पूरग्रस्त परतले

सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, आरवाडे प्लॉट, पटवर्धन पार्क, गोवर्धन प्लाॅट, साईनाथ नगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, जगदंब कॉलनी, पंत लाइन, काकानगर, दत्तनगर, शिवशंभो चौक, जामवाडी, हिंदवी स्वराज्य कॉलनी.

२१४५ नागरिक परतले

सांगलीतील ५०८ कुटुंबातील २ हजार १६६ नागरिकांनी पुराच्या काळात स्थलांतर केले होते. ते सर्व परतले आहेत. यातील ३० कुटुंबातील ११३ नागरिकांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात, तर ४७८ कुटुंबातील २०५३ नागरिकांनी स्वत:च्या सोयीने स्थलांतर केले होते. ६२५ जनावरेही स्थलांतरित केली होती.

महापालिकेकडून औषध फवारणी

पूरग्रस्त नागरिक परतल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारपासून पूर ओसरलेल्या नागरी वस्त्यांमध्ये औषध फवारणीस सुरुवात केली. रोगराई पसरू नये, यासाठी दक्षता घेण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Returned to the flood affected house in Sangli, started cleaning the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.