Sangli: आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या पिलाचे पुनर्भेट, वनविभागाची बचाव मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:03 PM2024-08-20T14:03:48+5:302024-08-20T14:04:10+5:30
विकास शहा शिराळा : गिरजवडे (ता. शिराळा) येथील शिवारात सापडलेल्या बिबट्याच्या २२ दिवसांच्या पिलाची वनविभागाने त्याच्या आईसोबत भेट घडवून ...
विकास शहा
शिराळा : गिरजवडे (ता. शिराळा) येथील शिवारात सापडलेल्या बिबट्याच्या २२ दिवसांच्या पिलाची वनविभागाने त्याच्या आईसोबत भेट घडवून आणली. मादी बिबट्या तीन पिलांचे स्थलांतर करताना एक पिल्लू शिवारातच राहिले होते. त्याला रविवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास मादी घेऊन गेली.
शनिवारी (दि. १७) सायंकाळी सहाच्या सुमारास पिलांचे स्थलांतर करताना लोकांची चाहूल लागल्याने मादी निघून गेली. त्यामुळे एक पिल्लू तेथेच राहिले. याची माहिती शेतकऱ्यांनी वनरक्षक स्वाती कोकरे यांना दिली. त्यानंतर उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक हणमंत पाटील, कोकरे, बचाव पथकाचे सदस्य संतोष कदम, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, युनूस मणेर, धीरज गायकवाड यांनी पिलाच्या सुटकेची मोहीम राबवली. पाऊस जोरात असल्याने पिलाच्या सुरक्षित राहण्याची सोय केली. मादीचा शोध घेतला असता, ती जवळच जंगलात वास्तव्याला असल्याचे दिसले.
रात्री दीड वाजता पिलाला नेले
पिलाला नेण्यासाठी मादी येत नसल्याने त्याच्या मृत्यूचा धोका होता. त्यामुळे त्याला शिराळा येथे वनविभागाच्या कार्यालयात आणून ठेवले. रविवारी सायंकाळी पुन्हा मूळ ठिकाणी नेऊन ठेवले; पण त्या रात्रीही मादीने पिलाला नेले नाही. सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान बचाव पथक पुन्हा तेथे गेले असता पिल्लू जागेवर दिसले नाही. कॅमेऱ्यांतील चित्रण पाहिले असता रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान मादीने पिलाला नेल्याचे दिसून आले.
बिबट्यांची बचाव मोहीम
यापूर्वीही शिराळा वनविभागाने पाडळी, तडवळे, शिरसी, वाटेगाव, टाकवे, निगडी, बांबवडे, नेर्ले येथे बिबट्याच्या पिलांना त्यांच्या आईच्या स्वाधीन केले आहे. कार्वे व ऐतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यांची सुटका केली आहे.