मिरजेत संघर्ष समितीचा पुन्हा प्रयोग
By Admin | Published: June 4, 2017 11:32 PM2017-06-04T23:32:01+5:302017-06-04T23:32:01+5:30
मिरजेत संघर्ष समितीचा पुन्हा प्रयोग
सदानंद औंधे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरजेत संघर्ष समितीच्या प्रयोगाची पुन्हा एकदा तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसचे आठ, राष्ट्रवादीचे पाच, भाजपचा एक असे १४ सदस्य संघर्ष समितीत जाणार असल्याने मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना संघर्ष समिती आव्हान देणार आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून मिरजेतील नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांशी सवतासुभा आहे. पदे मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या मिरजेतील नगरसेवकांनी प्रभाग समिती चारमध्ये मात्र सत्ताधाऱ्यांना नामोहरम केले आहे. गेल्या वीस वर्षांत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना प्रभाग समिती चारमधील मिरज पॅटर्न गट मोडीत काढता आलेला नाही. गत निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांनी मैदानाबाहेर काढलेल्या माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष समिती मिरजेतील २२ पैकी १४ सदस्य दाखल झाले आहेत. महापालिका निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्यानंतर मिरजेतील नगरसेवकांचा मोठा गट भाजपमध्ये जाणार असल्याची मोठी चर्चा सुरू झाली होती; मात्र भाजपशी बोलणी फिसकटल्यानंतर संघर्ष समितीतर्फे निवडणूक लढवून सत्तेत सहभाग मिळविण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. यापूर्वीही इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीने चार ते पाच सदस्यांच्या बळावर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपद मिळविले होते. मिरजेत नायकवडी विरुध्द जामदार यांच्यात नेहमीच राजकीय संघर्ष आहे. जामदार गट सत्तेत असल्याने नायकवडी गटाची विरोधी भूमिका आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संघर्ष समितीने महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसलाही अनेकवेळा धक्के दिले आहेत. महापालिका निवडणुकीत संघर्ष समितीतर्फे मिरजेतील २२ पैकी १४ नगरसेवक निवडणूक लढवून काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला आव्हान देणार आहेत. काँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे पाच, भाजपचा एक असे १४ सदस्य संघर्ष समितीत जाणार असल्याने मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी तक्रार करून इद्रिस नायकवडी यांना मैदानाबाहेर काढले होते. मात्र यावेळी इद्रिस नायकवडी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य संघर्ष समितीतर्फे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. संघर्ष समितीच्या बैठकीस माजी महापौर विवेक कांबळे, मैनुद्दीन बागवान, सुरेश आवटी, अल्लाउद्दीन काझी, शुभांगी देवमाने, मालन हुलवान, शिवाजी दुर्वे, जरीना बागवान उपस्थित होते.
मिरजेतील आणखी काही सदस्य व सांगलीतील चार सदस्य संपर्कात असल्याचा समितीचा दावा आहे. सत्तेसाठी एकत्र येण्याबाबत ख्याती असलेली मिरजेतील महत्त्वाकांक्षी असलेली नेतेमंडळी आता पुन्हा एकत्र आली आहेत. मात्र सत्तेचे गणित जमले नाही, तर ही मंडळी किती दिवस एकत्रित राहणार, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. मात्र प्रस्थापित नगरसेवक व त्यांच्या प्रभागात असलेल्या प्रभावामुळे संघर्ष समितीच्या आव्हानाचा सर्वच राजकीय पक्षांना सामना करावा लागणार आहे.
सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला चाप
माजी महापौर इद्रिस नायकवडी म्हणाले, सर्व पक्षांच्या नेतेमंडळींकडून नागरिकांचा व सदस्यांचाही भ्रमनिरास झाला आहे. यामुळे महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी व नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली सांगली-मिरजेतील अनेक नगरसेवक एकत्र आले आहेत. केवळ सत्ता मिळविणे हे आमचे ध्येय नसून, संघर्ष समितीच्या सदस्यांमुळे महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला चाप लागणार आहे.