Sangli- रेवणसिद्धाच्या खडी परिक्रमेस भाविकांची गर्दी, डोंगर गर्दीने फुलला
By श्रीनिवास नागे | Published: April 4, 2023 03:47 PM2023-04-04T15:47:00+5:302023-04-04T15:47:20+5:30
विटा (जि. सांगली ) : महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणावी (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री ...
विटा (जि. सांगली) : महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणावी (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिद्धाच्या चैत्र महिन्यातील खडी परिक्रमेस भाविकांची गर्दी होत आहे. दररोज हजारो भाविक हजेरी लावत आहे.
रेणावी येथे प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यात ३० दिवस खडी परिक्रमा घालण्याची परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यानंतर मागील वर्षीपासून भाविकांचा खडी परिक्रमा या प्रथेला प्रतिसाद मिळत आहे.
श्री रेवणसिद्ध येथे सुमारे दोन किलोमीटर अंतर असणारी मंदिराभोवतीची प्रदक्षिणा म्हणजे खडी. रेवणसिद्धांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आल्यावर ईशान्य दिशेला असणाऱ्या मंदिराला वळसा घालून डाव्या बाजूच्या पायवाटेने चालत डोंगर पायथ्याभोवतालच्या परिसराला प्रदक्षिणा घातली जाते. पायात चप्पल न घालता साधारण अडीच किलोमीटर अंतराची प्रदक्षिणा न थांबता, खाली न वाकता, एकही शब्द न बोलता, मागे न पाहता पूर्ण केली तर ती एक खडी झाली, असे मानले जाते.
खडी परिक्रमा भल्या सकाळी, पहाटे घातली जाते. यावेळी शुद्ध हवा व शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राहण्यास मदत होते. खडीमुळे सृजनशील जीवन जगण्याचा संदेश मिळतो. अडीच किलोमीटर अंतर चालल्यामुळे व्यायामाचे महत्त्वही कळते.
विविध स्तरातील आबालबुद्ध, स्त्री-पुरुष कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त १०१ खडी परिक्रमा पूर्ण करतात. गुढीपाडवा ते चैत्र अमावस्या यादरम्यान तीस दिवस खडी घातली जाते. खडी घालण्याचा समारोप करताना जमेल तसा शिधा आणि नारळ, दक्षिणा देवाला अर्पण केले जाते. काहीजण रोज तर काहीजण आठवड्यातून एकदा इच्छेनुसार खडी घालतात. एकावेळी एक ते काही भक्त सात-आठ खडी परिक्रमा पूर्ण करतात.
चैत्र महिन्यात सकाळी साडेसात वाजता देवाची आरती झाल्यानंतर दररोज महाप्रसाद दिला जातो. श्रध्दा आणि जीवनावश्यक शिकवण देणाऱ्या खडी परिक्रमा प्रथेला प्रतिसाद मिळत आहे. भाविकांची गर्दी होत आहे.
नवस फेडण्यासाठी घातली जाते खडी
खडी परिक्रमा ही धार्मिक प्रथा अनेक वर्षापासून चालत आली आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा योजलेले काम पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी खडी घातली जाते, असे श्री रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी सांगितले.