लाचखोर महिला फौजदाराची बदली
By admin | Published: November 7, 2014 10:59 PM2014-11-07T22:59:51+5:302014-11-07T23:44:39+5:30
अखेर उचलबांगडी : अधिकाऱ्याला हलविले
सांगली : लाचप्रकरणी अटक झालेल्या जत पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस फौजदार सीमा आघाव यांची जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली केली. ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक पी. एम. कदम यांचीही मुख्यालयाकडे बदली केली आहे. आर. ई. शेख यांच्याकडे जतचा कार्यभार सोपविला आहे.
बिळूर (ता. जत) येथे शेतजमिनीच्या वादातून मारामारी झाली होती. याप्रकरणी परस्पराविरुद्ध फिर्याद दाखल झाली होती. याचा तपास आघाव यांच्याकडे होता. यातील एका फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीतील संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यास आघाव टाळाटाळ करीत होत्या. यासाठी त्यांनी फिर्यादीकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती.
फिर्यादीने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने सापळा लावला होता. फिर्यादीकडून लाच घेण्यास आघाव यांनी नकार दिला. ती त्यांनी त्यांचा पती दत्ता बडे याच्याकडे देण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारताच दोघांनाही पकडले होते.
लाचलुचपत विभागाने केलेल्या या कारवाईचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, अहवाल येताच आघाव यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. त्यांच्याविषयी तक्रारी होत्या. त्यांना एक-दोन वेळा कामात सुधारणा करण्याची ताकीद दिली होती. ठाण्याचे अधिकारी कदम यांनाही सुनावले होते. मात्र तरीही त्यांच्या कामात बदल झाला नाही. यामुळे दोघांच्याही मुख्यालयात बदल्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)
पोलीस दलास हादरा
लाचलुचपत विभागाकडून लाचखोरांना पकडण्याची होत असलेली कारवाई नजरेत भरण्यासारखी आहे. मात्र त्यांच्या जाळ्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी सापडण्याचे प्रमाण मोठे असल्याने, पोलीस दलाच्यादृष्टीने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. विट्यातील हवालदार महादेव खोत याच्या अटकेनंतर दुसऱ्याचदिवशी सीमा आघाव लाच घेताना सापडल्याने पोलीस दलास हादरा बसला आहे.