मोकाट वाळू तस्करांपुढे महसूल विभाग हतबल
By admin | Published: June 28, 2017 11:12 PM2017-06-28T23:12:56+5:302017-06-28T23:12:56+5:30
कडेगाव तालुक्यातील चित्र : अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले चिंताजनक; कडक कारवाईची गरज
प्रताप महाडिक । -लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : येरळा नदीपात्रातील वाळू लुटून वाळू तस्कर मोकाट सुटले आहेत. आता महसूल विभागाच्या कारवाईला हे तस्कर जुमानतच नाहीत. वाळू तस्करांकडून या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. ही चिंतेची बाब असतानाही, राज्य शासन यावर ठोस उपाययोजना किंवा ‘मोक्का’सारखी कायदेशीर कारवाई करीत नाही. त्यामुळे या मोकाट वाळू तस्करांसमोर तालुक्यातील प्रशासन हतबल झाले आहे.
वाळूच्या पैशातून गबर झालेल्या वाळू तस्करांनी नदीपात्रात अक्षरश: थैमान घातले आहे. कडेगाव तालुक्यात वडियेरायबाग, कान्हरवाडी, वांगी, नेवरी, रामापूर, शिवणी आदी गावांच्या हद्दीत पोकलँड, जेसीबीच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा सुरूच असतो. सध्या कमी-जास्त प्रमाणात गावोगावी वाळू उपसा सुरूच आहे. कारवाई झाली तरी पळवाटा शोधून हेच वाळूतस्कर पुन्हा वाळू उपसा सुरू करतात. येरळा नदीच्या वाळूची मागणी आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे या नदीतील वाळूची तस्करीही वाढू लागली आहे. ही तस्करी रोखणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करणे, तसेच महसूल पथकावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना दमदाटी होत आहे. वाळू तस्करीतून झालेल्या अपघातात आजवर तिघांचा बळी गेला आहे, तर अनेकजण कायमचे अधू झालेले आहेत. नदीतील वाळू लुटून तस्कर मात्र मालामाल झाले आहेत.
अवैध वाळू उपसा व विक्रीतून आलेल्या मुबलक पैशातून हे वाळूतस्कर कुणालाच न जुमानता साम, दाम, दंड या नीतीचा वापर करुन वाट्टेल तसा बेसुमार वाळू उपसा करतात. आतापर्यंत वाळू उपशामुळे मोजता येणार नाहीत इतके मोठमोठे खड्डे नदीपात्रात पाडले आहेत.
प्रशासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कित्येक प्रांताधिकारी व तहसीलदार आले आणि गेले; परंतु येरळा नदीतील अवैध वाळूउपसा काही बंद झाला नाही. पाण्यासारखा पैसा मिळवून देणाऱ्या या अवैध व्यवसायात येणाऱ्यांची स्पर्धा वाढली आहे आणि या व्यवसायात गुन्हेगारीचा शिरकावही झाला आहे. शासनाने अशा गुंड प्रवृत्तीच्या व दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, परंतु याची कार्यवाही झाली तरच सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात यश येईल.
चंद्रकांतदादांची फक्त घोषणाच
अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांकडून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र आता असे हल्ले रोखण्यासाठी महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. वाळू तस्करांची दादागिरी मोडून काढण्यासाठी वाळू तस्करांना ‘मोक्का’ लावणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिसेंबर २०१६ मध्ये सांगलीत केली होती, परंतु अद्याप अशी एकही कारवाई झालेली नाही.
संघटनांच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग
येरळाकाठी सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे काही वाळूतस्कर सामाजिक संघटनांच्या व राजकीय पक्षांच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करत प्रशासनाला, तसेच वाळूतस्करी पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना खोट्या तक्रारी करून वेठीस धरत आहेत. अशा वाळू तस्करांचा बुरखा सामाजिक उठावातूनच फाटणार आहे. राजकीय नेते मात्र अशा वाळू तस्करांना थारा देत नाहीत, त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे.