जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलविषयक पुस्तकांचा खजिना एकाच ठिकाणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:35 AM2019-07-28T00:35:39+5:302019-07-28T00:36:49+5:30
जिल्हा प्रशासनाची बहुतांश सूत्रे याच विभागाकडे असतात. केवळ प्रशासनच नव्हे, तर जिल्ह्यातील सामान्यांतील सामान्य जनतेचा कधी ना कधी महसूल विभागाशी संपर्क येतच असतो.
शरद जाधव।
सांगली : जमीन महसुलासह अनेक महत्त्वाचे विषय सांभाळणाºया महसूल विभागातील कामकाजात सुसूत्रता यावी व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यातील नियम, कायदे समजावेत, या हेतूूने जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल ग्रंथालय साकारले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या संकल्पनेतून या ग्रंथालयाची निर्मिती होत असून, महसूलविषयक विविध पुस्तके या ग्रंथालयात असणार आहेत. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना कामकाजात या ग्रंथालयाची मोठी मदत होणार आहे.
सर्व शासकीय विभागातील महत्त्वाचा विभाग म्हणून महसूल विभाग समजला जातो. जिल्हा प्रशासनाची बहुतांश सूत्रे याच विभागाकडे असतात. केवळ प्रशासनच नव्हे, तर जिल्ह्यातील सामान्यांतील सामान्य जनतेचा कधी ना कधी महसूल विभागाशी संपर्क येतच असतो. अशा स्थितीत महसूलविषयक कामकाज करताना अनेकदा संदर्भ ग्रंथांची आवश्यकता असते.
महसूलविषयक अधिनियम, कायदे, त्यातील तरतुदी, जमीन, हक्कसह इतर अनेक बाबींविषयी काम करताना कायद्याची माहिती अधिकारी व कर्मचाºयांना असणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा सर्वच पुस्तके अधिकाºयांकडे उपलब्ध नसतात. नेमकी हीच गरज ओळखून जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असे वेगळे ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांना पत्रे पाठवून आपल्या विभागासाठी आवश्यक असणाºया पुस्तकांची यादी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक पुस्तकांची यादी देताना त्याचे लेखक, प्रकाशकाचीही माहिती द्यावी, जेणेकरून अचूक पुस्तक उपलब्ध करता येईल, असे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश विभागांनी आपल्या विभागाला आवश्यक असलेल्या पुस्तकांची यादी तयार करून सादर केली आहे. लवकरच याचे एकत्रिकरण होऊन पुस्तके मागविण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्षात आगळेवेगळे ग्रंथालय जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात सुरु होणार असल्यामुळे प्रशासनाची सोय झाली आहे.
ग्रंथालयामुळे अधिकारी, कर्मचाºयांसाठी सोय
शासनपातळीवरून अनेकवेळा कायद्यात बदल व सुधारणा होत असतात. अशा स्थितीत नवीन माहितीच्या आधारेच कामकाज करावे लागते. एकाचवेळी सर्व संदर्भग्रंथांची अनुपलब्धता व कामकाजातील अडचणीवरही उपाय मिळणार असल्याने या ग्रंथालयामुळे प्रशासनाची सोय होणार आहे. जिल्हाभरातील सर्व अधिकाºयांपासून कर्मचाºयांनाही याचा उपयोग होणार आहे.