Sangli News: महसूलच्या अधिकाऱ्यांना ट्रक मालकाकडून मारहाण, अधिकारी कोण?; जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 06:17 PM2023-01-30T18:17:55+5:302023-01-30T18:20:02+5:30
‘मी जातो. मात्र, पोलिसांना कळवू नका.’ असे म्हणत केला पोबारा
कोकरूड : बांधकामासाठी चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी करायला आलेल्या महसूलच्या विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना ट्रकवर कारवाई न करता ट्रक मालकाचा पाठीवर प्रसाद घेत माफी मागण्याची वेळ आली. या प्रकाराची चर्चा शिराळा तालुक्यासह कराड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. हे अधिकारी कोण? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शनिवार, दि. २८ रोजी कराड तालुक्यातील चिरा वाहतूक करणारा ट्रक रात्री साडेआठच्या सुमारास शेडगेवाडीहून कराडकडे निघला होता. यावेळी महसूल विभागाचे मंडल अधिकारी, दोन तलाठी रात्रीच्या गस्तीवर होते. या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत ट्रक सांगली जिल्ह्याच्या हद्दीजवळ पकडून येळापूर परिसरात आणला. मालाची पावती खरी की खोटी पाहण्यासाठी तीन तास ट्रक रोखून धरल्याने चालकाने ही माहिती मालकाच्या कानी घातली.
काही वेळाने कराड तालुक्यातून आलेल्या ट्रक मालक व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी या अधिकाऱ्याकडे ओळखपत्राची मागणी करत ट्रक का अडविला, याची विचारणा केली असता मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांना ओळखपत्र अथवा महसूल विभागात असल्याचा पुरावा दाखवता आला नाही. यामुळे गाडी मालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिघांना बदडून काढले.
रात्री साडेआकराच्या सुमारास माराच्या एक जण येळापूर गावात शिरला. ‘वाचवा वाचवा’ अशी आरडाओरड ऐकुन घराबाहेर आलेल्या काही लोकांनी ‘तुम्ही पोलिसांना फोन करा. गावात शिरू नका. चोर समजून आणखी मार खाल, असा सल्ला दिल्यानंतर ‘मी जातो. मात्र, पोलिसांना कळवू नका.’ असे म्हणत त्याने पाठीमागून आलेल्या चारचाकीमधून पोबारा केला.