गरजेइतके पाणी मिळाल्याने ताकारी योजना पूर्ववत
By admin | Published: April 19, 2016 11:51 PM2016-04-19T23:51:32+5:302016-04-20T00:32:48+5:30
अडविलेले पाणी सोडले : टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांकडून योजनेच्या प्रश्नाबाबत उडवाउडवीची उत्तरे--लोकमतचा दणका
कडेगाव : ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यात गरजेइतकी पाणी पातळी मिळाल्याने मंगळवारी ही योजना पूर्ववत सुरू झाली. टेंभू योजनेच्या टेंभू (ता. कऱ्हाड) येथील बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यातील पाणीपातळी खालावली होती. त्यामुळे ताकारी योजना बंद पडली होती. याबाबत टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु टेंभूच्या बंधाऱ्यातून पुढे पाणी सोडले. त्यामुळे सकाळी योजनेचे दहा पंप सुरू झाले.
टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे तसेच बेजबाबदार कामामुळे सलग तीन आवर्तनात ही ताकारी योजना बंद पडली. सांगली पाटबंधारे विभागाकडे ताकारी, टेंभू योजनेसह नदीवरील सिंचन व्यवस्थापनाची सर्वस्वी जबाबदारी आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता ना. नु. सूर्यवंशी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे ताकारी तसेच टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित असताना, टेंभू योजनेचे संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे काम करीत गरजेपेक्षा जादा पाणी अडवून ठेवतात. त्यामुळे ताकारी योजना तीनवेळा बंद पडली. याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केले आणि टेंभूचे अधिकारी खडबडून जागे झाले.
अडवून ठेवलेले पाणी पुढे सोडले. त्यामुळे ताकारी योजनेसाठी आवश्यक असणारी ५४० ते ५४१ मीटर इतकी पाणी पातळी मिळाली. त्यानंतर ताकारी योजनेचे १० पंप मंगळवारी सकाळी सुरू झाले.
ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊ महिना झाला होता. योजनेचे पाणी १०० किलोमीटरवर तासगाव तालुक्यात विसापूरजवळ गेले होते. आता कोरडा पडलेला मुख्य कालवा भरून १०० किलोमीटरपर्यंत पाणी जाण्यास दोन दिवस लागतील. या दोन दिवसातील पाण्याचा अपव्यय अणि वीज बिलाचा भुर्दंड ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. (वार्ताहर)
६० लाखाचा भुर्दंड
टेंभू बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे ताकारी योजना बंद, असे प्रकार आजपर्यंत तीनवेळा घडले. बंद झालेली योजना सुरू करून पुन्हा पाणी तासगाव तालुक्यात पोहोचण्यासाठी दोन दिवस लागतात. या दोन दिवसात अंदाजे २० लाख रुपये वीज बिल येते. अशाप्रकारे तीनवेळा ताकारी योजना बंद झाली. याचा ६० लाख रूपये भुर्दंड ताकारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनेचा झटका शेतकऱ्यांना बसत आहे.
चौकशी गरजेची
टेंभू बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे ताकारी योजना बंद पडल्याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यामुळे संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आणि अडवलेले पाणी सोडले. कोयनेतून पाणी कमी सोडल्यामुळे टेंभू बंधाऱ्यात पाणी अडवले होते, अशी उडवाउडवीची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय होती, याची चौकशी होणे गरजेचे आहे.