राजकीय समीकरणांचा प्रभाव आढावा मतदारसंघाचा : आघाडी धर्मापेक्षा ठरले मित्रप्रेम श्रेष्ठ
By admin | Published: May 18, 2014 12:16 AM2014-05-18T00:16:24+5:302014-05-18T00:16:38+5:30
सांगली : अनेकवेळा जातीय समीकरणांचा विचार सांगलीच्या लोकसभा निवडणुकीवेळी झाला असला तरी यंदा जातीय समीकरणांपेक्षा राजकीय समीकरणेच अधिक प्रभावी ठरली.
सांगली : अनेकवेळा जातीय समीकरणांचा विचार सांगलीच्या लोकसभा निवडणुकीवेळी झाला असला तरी यंदा जातीय समीकरणांपेक्षा राजकीय समीकरणेच अधिक प्रभावी ठरली. जातीय समीकरणांचा थोडा परिणामही दिसून आला. यंदा प्रथमच ज्या आघाडी धर्माचाही गाजावाजा झाला त्याचाही प्रभाव या मतदारसंघात चालला नाही. भविष्यातील राजकीय फायदे, उपकाराचा पैरा फेडणे, मित्रप्रेमाला जागणे आणि लोकांच्या मतांविरोधात न जाण्याची सावध भूमिका अशा अनेक गोष्टींचा परिणाम निकालावर जाणवत आहे. लढत बहुरंगी झाली, दुरंगी झाली तरीही सांगली लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या पदरी कधीही अपयश आले नव्हते. १९५१ पासून आजवर बहुरंगी लढतीत कॉँग्रेसला केवळ एकदाच अपयश आले. बहुरंगी लढतीतच कॉँग्रेस विजयी होत असावे, असा समज करून २00९ मध्ये सारे विरोधक एकवटले आणि त्यांनी अजितराव घोरपडेंना कॉँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्यासमोर उभे केले. कॉँग्रेसचे मताधिक्य घटले पण विजयी परंपरा कायम राहिली. मराठा विरुद्ध मराठा उमेदवाराचे कार्डही वापरून पाहण्यात आले, मात्र कधीही जातीय समीकरणांचाही कॉँग्रेसला तोटा झाला नाही. यंदा जातीय समीकरणांपेक्षा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा प्रभाव अधिक राहिला. आघाडी धर्मापोटी सारे नेते एकवटले असल्याचा गाजावाजा झाला, तरी प्रत्यक्षात अनेक राष्टÑवादी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला. कुणी मित्रप्रेमापोटी, कुणी केलेल्या उपकाराचा पैरा फेडण्यासाठी, तर कुणी स्वकीयांना धडा शिकविण्यासाठी खेळ््या केल्या. यंदा भाजपची लाट असल्यामुळे लाटेवर स्वार झालेल्या गावातील मतदारांच्या विरोधात न जाण्याची सावध भूमिका कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या काही नेत्यांनी घेतल्याचेही दिसून आले. अशा सर्व परिणामांचा परिपाक म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल आहे. (प्रतिनिधी)