सांगलीत पूरस्थिती उपाययोजनांचा आढावा, अधिकाऱ्यांनी सतर्कता व समन्वय ठेवावा : काळम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:29 PM2018-05-29T18:29:42+5:302018-05-29T18:29:42+5:30
सांगली जिल्ह्यात 2005 प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता ठेवावी. तसेच, सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी सुसंवाद व समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे दिल्या.
सांगली : सांगली जिल्ह्यात 2005 प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता ठेवावी. तसेच, सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी सुसंवाद व समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पावसाळापूर्व आंतरराज्यीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी यावेळी आलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता एस. एच. मुंजाप्पा, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. बी. पाटील, सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एस. करे, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता एस. ए. मोने, बागलकोटचे उपायुक्त मारूती, आलमट्टी धरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. इनामदार, चिकोडीचे तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, निपाणीचे तहसीलदार वाय. बी. नागथान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदि उपस्थित होते.
सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोयना व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी दैनंदिन समन्वय व सुसंवाद ठेवून पाणीपातळी धोकापातळीच्या वर जावू नये, यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी व आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिल्या.
पूरपरिस्थितीत बाधित होणाऱ्या गावांचा विचार करता पाटबंधारे, महसूल विभागाचे अधिकारी आणि आलमट्टी, कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी दररोज परस्पर संपर्कात राहावे. आलमट्टी धरण, कोयना धरणांची पाणीपातळी तसेच सातारा, कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकमधील पुलांच्या धोकादायक पातळीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देऊन 2005 सारखी पूरपरिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी सांगली पाटबंधारे विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी आलमट्टी धरण व कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची क्षमता, सद्यस्थितीतील पाणीपातळी, धोकापातळी यांची माहिती दिली.