एरंडोली, मालगावात काँग्रेसविरोधात बंड

By admin | Published: February 13, 2017 11:39 PM2017-02-13T23:39:37+5:302017-02-13T23:39:37+5:30

मिरज तालुक्यातील स्थिती : बेडग, कवठेपिरान गण बिनविरोध; जिल्हा परिषदेसाठी ४१, तर पंचायत समितीसाठी ५८ उमेदवार रिंगणात

Revolt against Congress in Erandoli, Malgaon | एरंडोली, मालगावात काँग्रेसविरोधात बंड

एरंडोली, मालगावात काँग्रेसविरोधात बंड

Next



मिरज : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी मिरज तालुक्यातील १८ पंचायत समित्यांसाठी ५८, तर ११ जिल्हा परिषदेसाठी ४१ उमेदवार उरले आहेत. जिल्हा परिषदेसाठी ५५, तर पंचायत समितीसाठी ७१ उमेदवारांनी माघार घेतली. बेडग गणात भाजप व कवठेपिरान गणात काँग्रेस उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. मिरज पूर्व भागात मालगाव, एरंडोली जिल्हा परिषद मतदार संघात बंडखोरी झाली आहे. अन्यत्र दुरंगी व तिरंगी लढती होणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. बेडग येथे नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या गीतांजली विष्णू कणसे व कवठेपिरान येथे तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे अनिल आमटवणे यांची बिनविरोध निवड झाली. तालुक्यातील मालगाव एरंडोली जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेसविरोधात बंडखोरी झाल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे. बेडग, भोसे, म्हैसाळ, आरग जिल्हा परिषद मतदार संघात दुरंगी लढत होत आहे. समडोळी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीविरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस, अशी दुरंगी लढत आहे.
कसबे डिग्रज जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी, बुधगाव जिल्हा परिषदेसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, कवलापूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस, भाजप व शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समितीसाठी दुरंगी व तिरंगी लढती होणार आहेत. आरग जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजप उमेदवाराविरूध्द काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, घोरपडे यांची विकास आघाडी एकत्र आली आहे. कवठेपिरान मतदार संघात स्वाभिमानी संघटनेचे पिराजी माळी, राष्ट्रवादीचे इकबाल तांबोळी, अरविंद सपकाळ यांनी माघार घेतल्याने, काँग्रेसचे अनिल आमटवणे यांची बिनविरोध निवड झाली. आमटवणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी सोमवारी मिरजेत जल्लोष केला. सर्वांनी सहकार्याच्या भूमिकेतून निवडणुकीत माघार घेऊन मला बिनविरोध निवडून दिले आहे, अशी भावना आमटवणे यांनी यावेळी व्यक्त केली.
बेडग मतदार संघात दीपिका जितेंद्र ओमासे, आक्काताई ओमासे, अपक्ष अर्चना नलवडे, शोभाराणी निकम, ज्योती पाटील, रोहिणी पाटील, मंगल भोसले, मंगल माने, जयश्री शिंदे या नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या गीतांजली विष्णू कणसे यांची बिनविरोध निवड झाली. (वार्ताहर)
भाजपविरोधात धनंजय मुंडेंच्या मेहुण्याच्या पत्नीची माघार
बेडग पंचायत समितीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ऊर्फ जितेंद्र ओमासे यांच्या पत्नी दीपिका ओमासे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सोमवारी दीपिका ओमासे यांनी अचानक माघार घेऊन राष्ट्रवादीला धक्का दिला. सर्वसाधारण विरूध्द ओबीसी असा संघर्ष टाळण्यासाठी व गरीब सामान्य उमेदवाराला संधी मिळावी या हेतूने माघार घेतली असल्याचे ओमासे यांनी सांगितले. ते म्हणाले, मी उमेदवारी मागे घेण्याशी धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नाही. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय माझा वैयक्तिक आहे. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. बेडगमध्ये मराठा विरूध्द वंजारी असा पारंपरिक संघर्ष आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या बेडग गणात दीपिका ओमासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मराठा विरूध्द वंजारी असा संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी माघार घेतल्याची चर्चा होती.
भाजपने खाते उघडले
बेडग येथे भाजपच्या गीतांजली कणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कणसे यांच्याविरोधात राष्ट्रवादीसह नऊ उमेदवारांनी माघार घेतली. गीतांजली कणसे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मिरजेत आ. सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. आ. खाडे यांनी कणसे यांचा सत्कार केला.
बामणोली, बुधगावसाठी १५ रोजी माघार
बामणोली व बुधगाव पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेस आक्षेप घेऊन काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. जिल्हा न्यायालयाने सोमवारी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला. मात्र या दोन गणांसाठी दि. १५ रोजी माघार अर्ज स्वीकारून त्या दिवशी उमेदवारांची अंतिम यादी तयार होणार आहे.
खुळे यांना घोरपडे गट, राष्ट्रवादीचे पाठबळ
एरंडोली जि. प. मतदार संघात काँग्रेसच्या जयश्री पाटील यांच्याविरोधात संगीता खुळे यांनी बंडखोरी केली आहे. खुळे यांना राष्ट्रवादी व घोरपडे गटाने पाठिंबा दिला आहे. एरंडोली पंचायत समिती मतदार संघात काँग्रेसच्या माधवी मलमे यांच्याविरोधात घोरपडे समर्थक शालन भोई यांनी बंड केले आहे. सलगरे पंचायत समितीत काँग्रेसच्या कोरे यांच्याविरोधात साबळे यांनी बंडखोरी केली आहे. मालगावात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शिवाजी माळी यांच्याविरोधात काँग्रेसचे कपिल कबाडगे यांनी बंड केले आहे. मालगाव पंचायत समितीत आघाडीच्या रूपाली दंडवडे यांच्याविरोधात अनिता क्षीरसागर व गुंडेवाडी गणात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे आप्पासाहेब हुळ्ळे यांच्याविरोधात काँग्रेसचे समर कागवाडे यांनी बंडखोरी केली आहे.

Web Title: Revolt against Congress in Erandoli, Malgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.