Sangli: गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यास बंड!, जतमधील भाजप नेत्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:35 PM2024-10-22T15:35:25+5:302024-10-22T15:36:01+5:30

स्थानिक कोणत्याही इच्छुकास उमेदवारी द्यावी

Revolt if Gopichand Padalkar is nominated, warns BJP leaders in Jat Sangli | Sangli: गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यास बंड!, जतमधील भाजप नेत्यांचा इशारा 

Sangli: गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यास बंड!, जतमधील भाजप नेत्यांचा इशारा 

सांगली : जतमधील कोणत्याही इच्छुक भूमिपुत्रास उमेदवारी दिली तर एकसंधपणे निवडणूक लढविली जाईल. बाहेरून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यास बंड अटळ आहे. स्थानिक आघाडी करून आम्ही निवडणूक लढवू, असा इशारा भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी पाटील, प्रकाश जमदाडे, शंकर वगरे, राजेंद्र कोळेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

जगताप म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जतमधील उमेदवारीचा शब्द दिल्याचे पडळकर सर्वत्र सांगत आहेत. त्यांचा अविर्भाव पाहता, तिकीट त्यांना दिले जाण्याची शक्यताही आहे. मात्र, जतमधील स्थानिक नेत्यांना बाहेरून लादलेला उमेदवार चालणार नाही. त्यासाठी इच्छुक असलेले आम्ही सर्वजण एकवटलो आहोत. भाजपने आमच्यातील कोणालाही उमेदवारी दिल्यास एकसंधपणे काम करण्यास तयार आहोत. मात्र, पडळकर यांची उमेदवारी आम्ही खपवून घेणार नाही. स्थानिक आघाडी करून आमच्यातील एक उमेदवार निवडणुकीत उभा केला जाईल.

तम्मनगौडा रवी पाटील म्हणाले, आमच्यात उमेदवारीवरून कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. त्यामुळे पक्षाने भूमिपुत्रालाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह आहे. या मुद्द्यावर सर्वजण ठाम आहोत. जतमध्ये येऊन पडळकर शिवराळ भाषेचा वापर करीत आहेत. अशा व्यक्तीला उमेदवारी देऊ नये.

प्रकाश जमदाडे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बाहेरील उमेदवाराने जतमध्ये येऊन उमेदवारीसाठी दावेदारी सुरू केली आहे. स्थानिक नेत्यांमध्ये इच्छुक अनेक असले तरी बाहेरील उमेदवाराविरोधात आम्ही सर्व एकत्र आहोत.

आटपाडी सोडून जतचा आग्रह का?

पडळकर हे आटपाडीचे आहेत. त्यांचा खानापूर मतदारसंघ सोडून ते जतसाठी आग्रह का धरत आहेत? जतमधील एमआयडीसी व अन्य विकासकामांचे श्रेय ते घेऊ पाहात आहेत. आटपाडीत त्यांनी का कामे केली नाहीत? असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला.

संजय पाटील यांचा संबंध नाही

स्थानिक नेत्यांच्या बंडामागे माजी खासदार संजय पाटील यांचा हात असल्याची चर्चा चुकीची आहे. ज्यांच्या विरोधात लोकसभेला काम केले, त्यांचा सल्ला विधानसभेला घेण्याचा संबंधच नाही, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

पडळकर यांच्यात खोट

राजेंद्र कोळेकर म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेतच खोट आहे. समाजाच्या आधारावर पदे मिळवायची अन् समाजाची फसवणूक करायची, अशी त्यांची राजकीय वाटचाल आहे.

Web Title: Revolt if Gopichand Padalkar is nominated, warns BJP leaders in Jat Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.