तरुणांमधील क्रांतीची उर्मी हरविली

By admin | Published: August 8, 2016 11:07 PM2016-08-08T23:07:04+5:302016-08-08T23:39:03+5:30

माधवराव माने : सेवावृत्तीने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचीही समाजास गरज

The revolution of youth has been lost | तरुणांमधील क्रांतीची उर्मी हरविली

तरुणांमधील क्रांतीची उर्मी हरविली

Next

आॅगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून अनेक क्रांतिकारकांनी उभारलेला लढा संपूर्ण देशभर गाजला आणि नोंदला गेला. अशी परंपरा असलेल्या सांगली जिल्ह्यात आजही स्वातंत्र्य चळवळीचे काही साक्षीदार हयात आहेत. सांगली जिल्हा स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीचे अध्यक्ष माधवराव माने हे त्यापैकी एक. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाचा अनुभव घेत त्यांनी संघर्षमय प्रवास नोंदविला. आॅगस्ट क्रांती दिन साजरा होत असताना समाजातील सध्याचे प्रश्न, लोकप्रतिनिधी, सरकार आणि नवी पिढी याबद्दल त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : तुमच्या काळात तरुणांमध्ये असलेली स्वातंत्र्याची, क्रांतीची उर्मी नव्या पिढीत हरविली आहे, असे वाटते का?
उत्तर : निश्चितच. त्यावेळी तरुणांमध्ये देशप्रेम, समता, बंधुता अशा गोष्टींविषयी जागृती करणारे व सेवाभावी वृत्तीने पिढी घडविणारे लोक होते. आता सेवावृत्तीने काम करणारे लोक दिसत नाहीत. त्यातच तरुणांना तशाप्रकारची ऊर्जा देण्याचे कामही होत नाही. त्यामुळेच क्रांतीसाठीची त्यावेळची उर्मी आता नव्या पिढीत दिसत नाही. यात तरुणांचा दोष नाही. त्यांच्यात या गोष्टी रुजविण्यासाठीची यंत्रणाच नाही. सरकारी पातळीवर, विशेषत: शिक्षण व्यवस्थेतून या गोष्टी पाझरत नाहीत. त्यामुळेच सामाजिक प्रश्नावर काहीतरी बदल घडवू पाहण्याची उर्मी आज असायला हवी, ती दिसत नाही. त्यामुळे क्रांतिकारकांचा, देशाचा, समाजाचा इतिहास चांगल्या पद्धतीने या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
प्रश्न : याचा काही अनुभव तुम्ही घेतला आहे का?
उत्तर : मी काही दिवसांपूर्वी एका शाळेत गेलो होतो. त्या शाळेतील मुलांना मी एक प्रश्न विचारला. विश्रामबाग चौकात एका बाजूला उभारलेला पुतळा आपण पाहिला आहे का? त्याच मार्गावरून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी होकारार्थी मान हलविली. तेथे पुतळा आहे हे त्यांना माहीत होते, मात्र तो कोणाचा आहे?, असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र एकाही मुलाला त्याचे उत्तर देता आले नाही. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. अर्थात मुलांचा यात दोष नाही. इतिहास आणि त्याअनुषंगाने नोंदल्या जाणाऱ्या गोष्टी यांचा परिचय त्यांना कुणीही करून देत नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतच या गोष्टी हव्यात. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार चळवळीचा डंका देशभर वाजला. ही चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेला गेली. हा इतिहास नव्या पिढीला माहिती नको का? ही अभिमानाची गोष्ट नव्या पिढीने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविली पाहिजे.
प्रश्न : राज्यातील, क्रेंद्रातील कोणतेही सरकार, राजकीय नेते यांची वाटचाल तुम्हाला कशी वाटते?
उत्तर : खूप वेदना होतात हे सर्व पाहून. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पेन्शनर्स अडचणीत आहेत. कामगारवर्ग तसेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कायम आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. स्वातंत्र्यसैनिकांकडे लक्ष दिले जात नाही. त्यांचेही प्रश्न प्रलंबित आहेत. अशा या सर्व प्रश्नांच्या गर्दीत आमदार, खासदारांनी स्वत:च्या मानधन वाढीचा निर्णय घेणे, हे आपल्यासाठी धक्कादायक आहे. लोकप्रतिनिधी सेवक आहेत, हुकूमशहा नव्हेत. समाजाप्रती सेवक म्हणून कार्यरत राहणारे नेते समाजात कुठे आहेत? त्यांना प्रश्नांची खरोखरीच जाण असती, तर त्यांनी स्वत:च्या मानधन वाढीपेक्षा अडचणीतील समाजघटकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली असती. असा प्रयत्न एकानेही केल्याचे दिसून आले नाही.
प्रश्न : स्वातंत्र्यसैनिक म्हणून तुम्हाला समाजात कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे?
उत्तर : समाजातील प्रत्येक घटकाकडे प्रामाणिकपणे लक्ष देणारे व त्यांचे प्रश्न सोडविणारे सरकार हवे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. इतिहास पोहोचविताना देशप्रेम, सामाजिक भान, त्यासाठीच्या योगदानाची मानसिकता निर्माण करणारी शिक्षणपद्धती हवी. या सर्व गोष्टी घडाव्यात म्हणून सेवक म्हणून कार्यरत राहण्याची तयारी असलेले लोकप्रतिनिधी तयार झाले पाहिजेत. लोकांनी अशाच प्रतिनिधींना पाठबळ दिले पाहिजे.

- अविनाश कोळी, सांगली

Web Title: The revolution of youth has been lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.