क्रांतिकारकांचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट
By admin | Published: August 7, 2016 12:12 AM2016-08-07T00:12:34+5:302016-08-07T01:06:00+5:30
पी. साईनाथ : विटा येथे ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ प्रदान
विटा : थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या तुफान सेनेने ब्रिटिशांची रेल्वे लुटली नाही, तर ब्रिटिशांनी लुटलेला भारतीयांचा पैसा परत आणून तो स्वातंत्र्यासाठी वापरला. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. आतापर्यंत पुरस्कार अनेक मिळाले, पण क्रांतिकारकांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराची तुलना अन्य पुरस्काराशी होऊ शकत नाही, असे मत शनिवारी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.
येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ पी. साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील, अॅड. सुभाष पाटील, कॉ. सुभाष पवार, माधवराव मोहिते उपस्थित होते.
पी. साईनाथ म्हणाले की, गेल्या २० वर्षात देशात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संख्या ६३ हजार आहे. औरंगाबाद शहरात सध्या १५० मर्सिडीज, बेन्झ या महागड्या गाड्या आहेत. त्याच भागात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. बॅँका अशा महागड्या गाड्या घेण्यासाठी ७.५० टक्के व्याजदराने कर्ज देते. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी त्याच बॅँका १५ टक्के व्याजदराने कर्ज देत आहेत. ही विषमता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आपला देश महासत्ता कसा बनणार?
क्रांतिसिंह नाना पाटील लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी होते. ब्रिटिशांनी लुटून नेलेला पैसा त्यांनी तुफान सेनेच्या सहकार्यातून परत मिळविला व तो स्वातंत्र्यासाठी वापरला. परंतु, आजचे नेते पैशाची लूट करीत असून, ते त्यांच्या खासगी बॅँक खात्यात जमा होत असल्याची टीकाही यावेळी पी. साईनाथ यांनी केली.
ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, १६४९ ला इंग्लंडची राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही अस्तित्वात आली. या घटनेची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात त्यावेळी जहागिरी व वतनदारी संपवून अठरापगड जाती एकत्रित करून समतेसाठी लढा दिला. परंतु, आज मूठभर लोकांच्याच घरात लक्ष्मी नांदत आहे. आर्थिक क्षमता सर्वसामान्य लोकांत जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत भारत समृध्द देश होणार नाही.
अॅड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास जे. के. (बापू) जाधव, प्रा. पी. ए. शितोळे, इंद्रजित पाटील, नानासाहेब पाटील, उत्तम पवार, शाब्बासराव मुळीक, जयराम मोरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)