लय भारी। सांगलीच्या हळदीला देशभरातून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:11 AM2019-05-05T04:11:32+5:302019-05-05T04:11:52+5:30
हळदीसाठी प्रसिध्द सांगलीच्या बाजारपेठेत स्थानिकबरोबर आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून हळदीची आवक वाढत आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार यामुळे सांगलीतील हळदीच्या आवकेत चांगली वाढ होत आहे.
- शरद जाधव
सांगली - हळदीसाठी प्रसिध्द सांगलीच्या बाजारपेठेत स्थानिकबरोबर आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून हळदीची आवक वाढत आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार यामुळे सांगलीतील हळदीच्या आवकेत चांगली वाढ होत आहे. संपूर्ण देशात हळदीसाठी प्रसिध्द असलेल्या आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या बाजारपेठांशी स्पर्धा करत सांगलीने उलाढालीत भरारी घेतली आहे. तामिळनाडूत उत्पादन घटल्याने व्यापाऱ्यांनीही सांगलीच्या बाजारपेठेला प्राधान्य दिले आहे.
मार्केट यार्डात स्थानिक भागाबरोबरच आंध्र प्रदेश, तामिळनाडू व कर्नाटकमधून वर्षाला सर्वसाधारणपणे १२ ते १४ लाख पोत्यांची हळदीची आवक होत असते. वार्षिक सहाशे कोटींवर उलाढाल असलेल्या या बाजारपेठेत आवक वाढतच आहे. यंदा कर्नाटकातून आवक वाढल्याने हंगामाच्या शेवटापर्यंत यंदाची आवक १६ ते १८ लाख पोत्यांवर जाण्याची शक्यता आहे. इथली हळद गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशसह दिल्ली व इतर प्रमुख बाजारपेठेत पाठविली जात आहे.
तामिळनाडूतील हळद उत्पादक पट्ट्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील बाजारपेठेत आवक घटली आहे.
दराची अपेक्षा
सध्या हळदीला प्रती क्ंिवटल सरासरी सात हजारपर्यंत दर मिळत असला तरी उत्पादकांना मात्र त्यात वाढ अपेक्षित आहे. किमान आठ ते दहा हजारापर्यंत दर मिळावा. अशी अपेक्षा आहे. तरीही मालाचा उठाव होत असल्याने व व्यवहारही थांबत नसल्याने दराची अपेक्षा ठेवत आवक वाढविली आहे.
सांगली बाजारपेठेत हळदीचे व्यवहार चांगल्या पध्दतीने होत असल्याने निर्धोकपणे शेतकरी येत आहेत. यंदा कर्नाटकात उत्पादन वाढल्याने त्याची आवक वाढली आहे व खरेदीदारही येत असल्याने देशभरात सांगलीतून हळद जात आहे.
- गोपाल मर्दा, हळद व्यापारी.