ई-मीटर तपासणीअभावी रिक्षांचे पासिंग थांबले!

By Admin | Published: December 6, 2015 11:18 PM2015-12-06T23:18:53+5:302015-12-07T00:30:27+5:30

जिल्ह्यातील रिक्षाचालक संतप्त : वजन-मापे विभागाकडून आठवड्यातून केवळ दोनवेळा तपासणी

Rickshaw passes stopped due to e-meter inspection! | ई-मीटर तपासणीअभावी रिक्षांचे पासिंग थांबले!

ई-मीटर तपासणीअभावी रिक्षांचे पासिंग थांबले!

googlenewsNext

सचिन लाड -- सांगली -रिक्षातील ई-मीटर तपासणी वजन-मापे विभागाकडे सोपविण्यात आली आहे. रिक्षा पासिंगला नेण्यापूर्वी चालकांना वजन-मापे विभागात मीटरची तपासणी करुन त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊनच पुढे जावे लागत आहे. पण वजन-मापे विभागाने आठवड्यातून केवळ दोनवेळा तपासणीसाठी वेळ दिला आहे. मीटर तपासणीच्या नावाखाली जवळपास तीनशे रुपये मोजावे लागत आहेत. एवढे करूनही वेळेत तपासणीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने, शेकडो रिक्षांचे पासिंग थांबले आहे.
आरटीओ कार्यालयाकडून वर्षातून एकवेळ रिक्षाची ‘फिटनेस’ (पासिंग) तपासणी केली जाते. यासाठी चालकांना रिक्षा सुसज्ज करुन न्यावी लागते. तीन वर्षापूर्वी रिक्षात ‘ई-मीटर’ बसविण्यात आले. हे मीटर सुरू आहे का नाही, याची तपासणी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) कार्यालयाकडे होती. यासाठी ते केवळ पन्नास रुपये शुल्क आकारत होते. पासिंगला जाण्यापूर्वी चालक आयटीआयमध्ये रिक्षा नेत होते. तिथे मीटरची तपासणी करुन त्याचे एक किलोमीटर अंतरापर्यंत रीडिंग पडते का, याची पाहणी केली जायची. त्यानंतर ते मीटर सुसज्ज आहे, असे प्रमाणपत्र घ्यायचे. मात्र शासनाने ५ जून २०१५ पासून मीटर तपासणीची जबाबदारी वजन-मापे विभागाकडे सोपविली आहे. या विभागाने सुरुवातीपासूनच मीटर तपासणी करण्यास वेळ देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. त्यामुळे दररोज रिक्षा पासिंगला नसतात. या विभागाने शंभरफुटी रस्त्यावर मीटर तपासणीची सोय केली आहे. ते आठवड्यातून बुधवार आणि गुरुवारी या दोनच दिवशी तपासणीला येत असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रिक्षाचालकांची गर्दी असते.
मीटर तपासणीसाठी दोनशे दहा रुपये शुल्क आकारले जात आहे. रिक्षात बसून ते एक किलोमीर अंतरापर्यंत जाऊन येतात. या अंतरानुसार मीटरचे रीडिंग पडते का नाही, हे पाहून ते प्रमाणपत्र देत आहेत. तत्पूर्वी चालकांना मीटर सुस्थितीत आहे का नाही, याची बाहेरून तपासणी करून घ्यावी लागत आहे. त्यासाठी पुन्हा शंभर-दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. दोन्हीकडील खर्च तीनशे ते चारशे रुपयांच्या घरात जात आहे. पैसे जाऊनही वेळेत तपासणी करुन मिळत नाहीत. वजन-मापे अधिकारी आठवड्यातून एकदाच येत असले तरी, ते कोणत्या वारी येतील, याचा नेम नसतो. त्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय बंद ठेवून तपासणीसाठी रांगेत जाऊन थांबावे लागते. वेळेत तपासणी होत नसल्याने पासिंग होत नाही. पासिंगची मुदत संपली तरी आरटीओ कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.


रिक्षाचालकांना दणका
अनेक रिक्षात आजही ई-मीटर नाही. जरी असले तरी ते प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. अनेकदा आरटीओंनी सांगूनही मीटर बसविले नाही. त्यामुळे मीटर बसविल्याशिवाय पासिंग केले जाणार नाही. तसेच मीटर सुस्थितीत आहे का नाही, याबाबतचे वजन-मापे विभागाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी चालकांना आठवडाभर वजन-मापे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहे. वजन-मापे अधिकारी तपासणी करीत असले तरी, मीटर दुरुस्ती करणाऱ्याच्या दुकानातून प्रमाणपत्र आणायला जावे लागते. तरीही प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने रिक्षाचालकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

चारशे-पाचशे रुपये खर्च करुनही वजन-मापे विभागाकडून वेळेत प्रमाणपत्र मिळत नाही. सकाळी नऊपासून ते रात्री आठपर्यंत रिक्षाचालकांना तपासणीसाठी थांबावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे आयटीआय कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळण्याची सोय करावी; अन्यथा आंदोलन उभे केले जाईल.
- महेश चौगुले,
जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक अ‍ॅपे रिक्षा संघटना, मिरज
मीटर तपासणी वजन-मापे विभागाकडे देण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला आहे. शासनस्तरावर यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही व तसे आदेश नाहीत. तपासणीसाठी लागणारे कर्मचारी व यंत्रसामग्री पुरविली गेली नाही. आमचे काम पाहून हे काम करावे लागत आहे. त्यामुळे तपासणीला विलंब लागतो.
- पांडुरंग बिरादार,
सहायक नियंंत्रक,
वजन-मापे विभाग, सांगली.

Web Title: Rickshaw passes stopped due to e-meter inspection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.