घंटानाद व शपथ घेऊन होणार रेल्वेचे सारथ्य-नव्या वर्षापासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:55 PM2019-01-14T23:55:41+5:302019-01-14T23:56:05+5:30
मिरज : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाअंतर्गत धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे चालक नवीन वर्षापासून घंटानाद करून रेल्वे सिग्नलचे पालन करीत ...
मिरज : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाअंतर्गत धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे चालक नवीन वर्षापासून घंटानाद करून रेल्वे सिग्नलचे पालन करीत आहेत. लाल दिव्याचे उल्लंघन करणार नाही, अशी शपथ घेऊन चालक रेल्वे चालवित आहेत.
पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देउसकर व यांत्रिक विभागाचे अभियंता जोएल मेकॅन्झी यांनी सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी पुणे विभागात हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पॅसेंजर, एक्स्प्रेस, मालगाडीचालकांना सारथ्य करण्यापूर्वी अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची शपथ देण्यात येत आहे.
सुरक्षिततेसाठी चालकांनी वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. रेल्वेचालकाचे सिग्नलकडे दुर्लक्ष हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. मिरजेत सुमारे ५० चालक व ७० सहायक चालक काम करीत असून, मिरज स्थानकातून पुणे, कोल्हापूर, बेळगाव, पंढरपूर, सोलापूरकडे चालक रेल्वेगाड्या घेऊन जातात. नियुक्त स्थानापासून ते ठरवून दिलेल्या स्थानकापर्यंत हजारो प्रवाशांना सुरक्षित नेण्याची जबाबदारी चालकांची असते. नवीन वर्षापासून मिरज स्थानकात लोको पायलट लॉबीमध्ये नियमांचे उल्लंघन करणार नाही, अशी शपथ व घंटानाद करीत सुरक्षित गाडी घेऊन जात असल्याची फलकावर नोंद करून चालक कर्तव्यावर जात आहेत.
चालकांसाठी येथे पितळी घंटा व नोंद फलक लावला आहे. प्रवाशांची सुरक्षितता निश्चित झाली आहे. रेल्वे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असून, रेल्वे चालकांनाही जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या मध्य रेल्वेच्या या उपक्रमास चालकांचाही चांगला प्रतिसाद आहे. याशिवाय प्रवास करून थकलेल्या चालकांसाठी विश्रांतीसाठी मिरजेतील रेल्वे कर्मचारी वसाहतीत सुसज्ज रनिंग रूमची व्यवस्थाही आहे.
योगा, ध्यानधारणा करण्याचीही सोय
गाडी चालविताना चालकाचे लक्ष विचलित होऊ नये, त्याचे मानसिक संतुलन चांगले रहावे यासाठी ध्यानधारणा, योगा करण्याची येथे सोय आहे. चालकांसाठी ओपन जिमचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. रनिंग रूममध्ये विश्रांतीसाठी आलेल्या चालकांना भोजनासह अन्य सुविधा देण्यात येत आहेत.