म्हैसाळ योजनेतील पाण्याची पळवापळवी

By admin | Published: March 21, 2016 12:41 AM2016-03-21T00:41:35+5:302016-03-21T00:42:58+5:30

शेतकऱ्याविरुध्द पोलिसात तक्रार : संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविले; नियोजनातील गोंधळ

Riding the water in Mhasal Yojana | म्हैसाळ योजनेतील पाण्याची पळवापळवी

म्हैसाळ योजनेतील पाण्याची पळवापळवी

Next

सदानंद औंधे --मिरज --उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे ‘म्हैसाळ’चे पाणी पळविण्याचे प्रकार वाढत आहेत. लिंगनूर शाखा कालव्यातून संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविल्याबद्दल गायकवाडवाडी येथील शेतकऱ्याविरूध्द ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. दोन दिवसापूर्वी कळंबी शाखा कालव्याचे पाणी अडविण्याचा प्रकार घडला.
म्हैसाळ कालव्यातून पाच टप्प्यातून ४५ पंपांद्वारे पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पाणी सोडण्यात आले आहे. पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची गरज मोठी असल्याने कालवा अडविण्याचे, कालवा फोडण्याचे, पाण्याची दिशा वळविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
गेल्या आठवड्यात आरगजवळ कालव्यात जेसीबीने बांध घालून पाणी अडविण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी रात्री कालव्यावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी लिंगनूर शाखा कालव्याचे गेट पळवून, संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मनोज गायकवाड या शेतकऱ्याविरूध्द पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. कळंबी शाखा कालव्यावर पाणी अडवून ते वळविण्यात आले. पाणी वापराच्या नियोजनात बदलामुळे गोंधळ उडाला होता. पाणी अडविणाऱ्या व पळविणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले

जत वंचितच : महिना झाला तरी पाणी नाही...
आवर्तन सुरू होऊन एक महिना झाला तरी, अद्याप जत तालुक्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. टंचाईची तीव्रता वाढत असल्याने जत तालुक्यात पाणी सोडावे, यासाठी मोठा दबाव आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यात पोटकालव्यातून वितरण सुरू ठेवून जत तालुक्यात पाणी पोहोचणे कठीण असल्याने, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील वितरण बंद करावे लागणार आहे. येत्या चार दिवसात जत तालुक्यात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत.


आजवरची सर्वात जास्त वसुली
योजना कार्यान्वित झाल्यापासून आजअखेर जास्तीत जास्त पाणीपट्टी वसुली ६0 लाखांपर्यंत गेली होती. यंदा २ कोटी रुपये शेतकऱ्यांनी जमा केले आहेत. याशिवाय कारखान्यांनी ३ कोटी, असे एकूण ५ कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही शेतकरी पैसे भरत आहेत. त्यामुळे आणखी दीड कोटी रुपये जमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आवर्तन मेअखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. जत आणि सांगोल्याचे पैसे जमा झाल्यानंतर पुन्हा वसुलीचा आकडा वाढणार आहे.


पाणीपट्टी न भरणाऱ्यांकडून दीडपट वसुली...
म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी साखर कारखान्यांनी तीन कोटी रूपये भरले आहेत. मात्र आवर्तन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून आणखी दोन कोटी रूपये जमा झाले आहेत. पाणीपट्टी न भरणाऱ्या व मागणी न नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांकडून दीडपट आकारणी करण्यात येणार असल्याचे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Riding the water in Mhasal Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.