यात्रांमध्ये पुन्हा उडणार बैलगाडी शर्यतींचा धुरळा!

By admin | Published: February 28, 2017 11:39 PM2017-02-28T23:39:27+5:302017-02-28T23:39:27+5:30

आशा पल्लवीत : विधी व न्याय विभागाला प्रस्ताव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शौकिनांमध्ये उत्साह

Riding in the yatra bullock cart races! | यात्रांमध्ये पुन्हा उडणार बैलगाडी शर्यतींचा धुरळा!

यात्रांमध्ये पुन्हा उडणार बैलगाडी शर्यतींचा धुरळा!

Next



सातारा : जिल्ह्यातील गावोगावच्या यात्रांना विशेष महत्त्व आहे. त्यातील बहुतांश गावातील यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहेत. साहजिकच यात्रांमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती हे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल होते. पण गेल्या काही महिन्यांपासून बंदी घातल्याने शर्यतींचा धुरळा बसला. बैलगाड्या शर्यतींवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री पातळीवर हालचाली सुरू झाल्याने बसलेला धुरळा पुन्हा उडण्याची आशा निर्माण झाली आहे.
पाणीदार सातारा जिल्ह्यात जागोजागी उसाचे फड पाहायला मिळतात. येथील शेतकरीही सधन त्यामुळे शेतात नवनवे प्रयोग करत असतानाच ते हौस, छंद जोपासण्यात कुठेही मागे नाही. अनेकांनी जातिवंत जनावरांचे संगोपन केले आहे. त्यासाठी दर महिन्याला हजारो रुपये खर्च करत आहेत.
गावोगावच्या यात्रांमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती भरविण्याची जिल्ह्यातील पूर्वापार परंपरा. यासाठी जातिवंत खिलार बैलांची गरज असते. त्यांच्या किमतीही तशाच असतात. त्यांना सांभाळणे, त्यांचा खुराक यांचा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. तरीही पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम करणारे शेतकरी या बैलांवर दर महिन्याला लाखो रुपये खर्च करतात.
या बैलांनीही मालकाचं नाव राखलं आहे. अनेक बैलांनी मालकांना ‘ट्रॉफीच्या ट्रॉफी’ मिळवून दिल्या आहेत. काही शर्यतींमध्ये तर चांदीचं कडंही मिळत आहे. त्यामुळे या बैलगाडी मालकांचा रुबाब संपूर्ण पंचक्रोशीत वाढतो.
या परंपरेला गेल्या काही दिवसांमध्ये ग्रहण लागले. या शर्यतींवर बंदी आली अन् यात्रेतील शर्यतींचा धुरळा बसला. तरुणांची यात्रेविषयी मजाच निघून गेली. पण तरीही या निर्णयाचा मान राखत कोठेही शर्यती घेतल्या नाहीत; पण या बैलांना केवळ सांभाळण्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे बंदी हटवून तमिळनाडूतील जल्लिकट्टूप्रमाणे महाराष्ट्रातही शर्यती सुरू करण्याची मागणी जोर धरत होती.
राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सोमवार, दि. ६ पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्यातील बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी कायद्यात तरतुदी करण्याबाबत चर्चा होऊ शकते. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे शर्यतींबाबत
आशा पल्लवीत झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
जल्लिकट्टूने दिलं बळ...
महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आहे. याबाबत न्यायालयीन लढाई सुरू होती. पण गेल्या महिन्यात जल्लिकट्टूवरील बंदी हटविण्यासाठी तमिळनाडूत मोठं आंदोलन झालं. तेथील जनता रस्त्यावर उतरली. त्यामुळे महाराष्ट्रातील पशुपालकांना बळ मिळालं. येथील अनेक संघटनांनी जल्लिकट्टूच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याचवेळी जिल्ह्णातही आंदोलन करत महाराष्ट्रात बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

Web Title: Riding in the yatra bullock cart races!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.