Sangli News: माजी पंचायत समिती सदस्याला गोळीबारप्रकरणी सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:43 PM2023-03-09T16:43:29+5:302023-03-09T16:43:52+5:30
राजकीय कारणावरून बिगर परवाना रिव्हॉल्व्हर रोखून धमकी देत, हवेत केला होता गोळीबार
सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे राजकीय कारणावरून बिगर परवाना रिव्हॉल्व्हर रोखून धमकी देत, हवेत गोळीबार केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब तुकाराम भंडारे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. भंडारे हा माजी पंचायत समिती सदस्य आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी हा निकाल दिला. भंडारे याच्यासह अन्य आरोपींनाही या प्रकरणात शिक्षा झाली आहे.
खटल्याची अधिक माहिती अशी की, २३ मार्च २०१२ रोजी मालगाव येथील सिद्धार्थनगर येथे हा प्रकार घडला होता. आरोपी भंडारे हा आपल्या साथीदारांसह मोटारीतून आला व त्याने फिर्यादी वसंत अप्पासाहेब खांडेकर यांच्याशी वाद घातला. यात ‘तुम्ही आमच्या समाजातील वर्चस्व कमी करताय काय, तुम्हाला जास्त मस्ती आली आहे’ असे म्हणून शिवीगाळ सुरू केला.
यानंतर बाळासाहेब भंडारे याने बिगर परवाना रिव्हॉल्व्हर खांडेकर यांच्या छातीवर रोखून धमकावत हवेत गोळीबार केला होता. तर रमेश शिवाजी तेलकिरे याने तलवारीने खांडेकर यांच्या तोंडावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. भंडारे याचे इतर साथीदारांनी सिद्धार्थनगर येथील समाज मंदिरासमोर असलेल्या बाकडे तोडून नुकसान केले होते. यानंतर फिर्यादी वसंत खांडेकर यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी खटल्याचे काम पाहिले. या खटल्यात पोलिस हवालदार शामकुमार साळुंखे व पैरवी कक्षातील पोलिसांचे सहकार्य मिळाले.