मंजूर, नामंजूरच्या घोषणांनी गाजली सांगली शिक्षक बँकेची सभा, नफा वाटणीवरून गदारोळ
By शीतल पाटील | Published: September 26, 2022 04:18 PM2022-09-26T16:18:19+5:302022-09-26T16:18:47+5:30
सांगली : दोन महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या संचालकांनी विरोधकांची कोंडी करीत शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळाची परंपरा खंडीत ...
सांगली : दोन महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या संचालकांनी विरोधकांची कोंडी करीत शिक्षकबँकेच्या सभेत गोंधळाची परंपरा खंडीत केली. नफा वाटणीवरून विरोधक आक्रमक होते. सभागृहात निषेधाचे फलकही झळकविले. त्यांच्या विरोधाची दखल न घेताच सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावर सर्व विषय आवाजी मतांनी मंजूर केले. मंजूर-ना मंजूरच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सभा माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्षा अनिता काटे, संचालकांसह बँकेचे अधिकारी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने सभेस सुरवात झाली. अमोल शिंदे यांनी स्वागत केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले.
त्यानंतर अध्यक्ष विनायक शिंदे यांनी माईकचा ताबा घेत अजेंड्यावरील विषयांचे वाचन करीत निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक विषयाला उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट व विजयाच्या घोषणा देत मंजुरी दिली.
नफा वाटणीवरून विरोधकांनी रान उठविले होते. पण या मुद्दावर विरोधकांच्या कारभारावर ताशेरे ओढत कोंडी केली. बँकेला इमारत, जागा, फर्निचर, संगणक व सॉप्टवेअर खरेदी यासाठी लागणार्या भांडवली गुंतवणुकीस मंजुरी देण्यात आली. यावेळी मंजूर-नामंजूरच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. उपाध्यक्षा अनिता काटे यांनी आभार मानले.