ऋषिकेश बोडस यांना ‘देवल पुरस्कार’ प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:46 PM2018-11-13T23:46:03+5:302018-11-13T23:46:24+5:30
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे मंगळवारी देवलांच्या ऐतिहासिक पारावर रंगलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ गायक, अभिनेते ऋषिकेश बोडस यांना ‘नाट्याचार्य ...
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे मंगळवारी देवलांच्या ऐतिहासिक पारावर रंगलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ गायक, अभिनेते ऋषिकेश बोडस यांना ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बोडस यांना महापौर संगीता खोत, गुरूनाथ कोटणीस महाराज यांच्याहस्ते हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. हरिपूरचे सरपंच विकास हणबर, भाजपचे सरचिटणीस अरविंद तांबवेकर, देवल स्मारक मंदिरचे अध्यक्ष शरद बापट, अंजली भिडे, सुनीता शेरीकर, नगरसेविका भारती दिगडे आदींची उपस्थिती होती.
अध्यक्ष बापट यांनी देवल स्मारकच्या कार्याविषयी व आजवरच्या वाटचालीविषयीची माहिती उपस्थितांना दिली. संस्थेने राज्यासह परराज्यात सादर केलेल्या नाटकांची आणि मिळालेल्या पुरस्कारांची माहिती सांगितली. संजय रूपलग यांनी मानपत्राचे वाचन केले. पुरस्कारप्राप्त बोडस, कोटणीस महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. सायंकाळी उशिरा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
नवी परंपरा : संगमावरील सोहळा
दरवर्षी हा पुरस्कार सांगलीत प्रदान करण्यात येतो, मात्र यंदा कृष्णा-वारणा नदीच्या संगमावरील ज्या पारावर बसून देवलांनी ऐतिहासिक ‘संगीत शारदा’ नाटक लिहिले, त्या पारावरच हा पुरस्कार देण्यात आला.