Diesel price hike : मालवाहतूक महागली, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 01:52 PM2021-11-16T13:52:58+5:302021-11-16T13:55:40+5:30

डिझेलच्या दरवाढीचा शेतीच्या कामावरही परिणाम होणार आहे. शेताची नांगरणी व पेरणीसाठी प्रतिएकर १,४०० रुपये असा दर होता. या हंगामात तो १,७०० ते १,८०० रुपयांवर पोहोचला आहे. तर, सांगलीतून मुंबईसाठी १० हजार रुपयांत मालवाहतूक व्हायची, आता १४ हजार रुपये मोजावे लागत आहेत.

Rising diesel prices have made freight more expensive | Diesel price hike : मालवाहतूक महागली, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

Diesel price hike : मालवाहतूक महागली, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

Next

संतोष भिसे
सांगली : डिझेलच्या दरवाढीचा बडगा प्रत्येक घटकाला सोसावा लागत आहे. ७९ रुपयांवरुन थेट १०४ रुपयांपर्यंत गेलेल्या डिझेलने वाहतूकदारांना भाडेवाढीशिवाय पर्याय ठेवला नाही. सांगलीतून मुंबईसाठी १० हजार रुपयांत मालवाहतूक व्हायची, आता १४ हजार रुपये मोजावे लागत आहेत.

डिझेलची दररोजची दरवाढ ९० रुपयांपर्यंत पोहोचली तरी वाहतूकदारांनी विशेष भाडेवाढ केली नव्हती. त्यानंतर मात्र प्रतिकिलोमीटर आणि प्रतिटन भाडे वाढवण्यात आले. सांगलीतून मुंबईसाठी प्रतिटन १००० ते १२०० रुपये झाले आहे. पुणे, सोलापूरला ९००, तर लातूरसाठी १,२०० ते १,५०० रुपयांवर पोहोचले आहे. स्थानिक स्तरावर मालवाहतुकीचे किमान भाडे ३०० ते ४०० रुपये होते, ते आता ५०० ते ७०० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांना त्याची झळ बसत आहे.

कूपनलिका खोदाई ८० रुपये प्रतीफूट

कुपनलिका खोदाईसाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खर्ची पडते. सामान्यत: डिझेलचा दर जितका, तितकाच खोदाईचा प्रतिफूट दर असतो. मे-जून महिन्यात तो ६५ रुपयांपर्यंत स्थिर होता. त्यानंतर डिझेलची दरवाढ वेगाने होत गेली, तसे खोदाईचे दरही वाढले. सध्या प्रतिफूट ७५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ३०० फूट खोल खोदाईसाठी २५ हजार रुपये खर्च व्हायचा, आता ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत.

नांगरणी, पेरणी महाग

शेताची नांगरणी व पेरणीसाठी प्रतिएकर १,४०० रुपये असा दर होता. या हंगामात तो १,७०० ते १,८०० रुपयांवर पोहोचला आहे. जेसीबीने खोदाईचा दर ताशी सरासरी ७०० रुपये होता, तो १००० रुपये झाला आहे. त्यामुळे पाईपलाईन खोदाई सामान्य शेतकऱ्यासाठी डोईजड झाली आहे.

वाहतूकदार संघटनेने अधिकृतरित्या भाडेवाढ केलेली नाही. वैयक्तिक स्तरावर काही प्रमाणात झाली आहे. बाजारातील उलाढाल अजूनही पुरेशी सुरु झालेली नाही. त्यामुळे भाडेवाढ टाळण्याचा प्रयत्न केला आहे. डिझेल दरवाढीचा थेट फटका बसत असल्याने लवकरच निर्णय घ्यावा लागेल. डिझेलची दरवाढ दररोज न करता दर तीन महिन्यांनी करावी, अशी आमची मागणी आहे. - बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, ट्रान्सपोर्ट असोसिएशन

पर्यटनासाठीच्या वाहनांचे भाडे प्रतिकिलोमीटर दोन ते तीन रुपयांनी वाढवले आहेत. पर्यटनासाठी मोठ्या संख्येने लोक अद्याप बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे भाड्यामध्ये तडजोड करुन व्यवसाय करावा लागत आहे. कर्नाटकात प्रवासी घेऊन गेल्यानंतर येताना इंधनाची टाकी फुल्ल करतो. त्यामुळे चार पैशांची बचत होते. - बलवंत कांबळे, पर्यटन वाहतूकदार, मिरज.

लांब पल्ल्याची मालवाहतूक सरासरी चार हजार रुपयांनी महागली आहे. सांगली - मिरजेच्या औद्योगिक वसाहतीतून मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद, बंगळुरू येथील मालवाहतुकीसाठी सरासरी २० ते ४० टक्के जादा भाडे द्यावे लागते. डिझेलचे दर काहीअंशी उतरले, तरी वाढलेले भाडे मात्र कमी झालेले नाही.- रमेश आरवाडे, उद्योजक, कुपवाड औद्योगिक वसाहत

Web Title: Rising diesel prices have made freight more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.