सांगली, कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:48 AM2020-08-18T03:48:00+5:302020-08-18T03:48:11+5:30

कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे.

The risk of floods increased in Sangli, Kolhapur | सांगली, कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला

सांगली, कोल्हापुरात महापुराचा धोका वाढला

Next

मुंबई/कोल्हापूर : मुंबई कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात सोमवारी देखील पावसाचे धुमशान सुरूच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने मुंंबईत सखल भागात पाणी साठून रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला होता. कोल्हापुरात पंचगंगा इशारा पातळीकडे सरकू लागली आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली संततधार कायम असून पंचगंगा इशारा पातळीकडे सरकू लागली आहे. जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होऊन कर्नाळ रस्त्यावर पाणी येत असून नदीकाठी असलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून, सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कोकणात सर्वत्र पाऊस असून रत्नागिरी जिल्ह्यात जोर चांगलाच वाढला आहे. दापोली तसेच चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. संगमेश्वरमधील गडनदी, राजापुरातील अर्जुना, लांजा येथील मुचकुंदी, खेड येथील पिंपळवाडी धरण शंभर टक्के भरले आहेत.
मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. किनवटसह माहूर, हदगाव आणि भोकर तालुक्यात जोर होता़ विदर्भातही अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. गडचिरोलीत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील अनेक मार्ग अजूनही बंदच आहेत. मात्र काही नद्यांचा पूर ओसरला आहे.
>पूर स्थितीसाठी प्रशासन सज्ज
पुणे विभागातील कोल्हापूरसह, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. गतवर्षी सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केला असून, पुर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
>पाच तरुणांना वाचविले
शिरोळ (जि. कोल्हापूर): शेतीचा वीज पंप काढत असताना हातातील दोर निसटून गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील पाच युवक तराफावरून कृष्णा नदीच्या पुरात तब्बल दहा किलोमीटर वाहून गेले. दोन तासांच्या थरारानंतर वजीर रेस्क्यू टीमचे रौफ पटेल, सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल, आदींनी या युवकांना गौरवाड येथे सुखरूपपणे बाहेर काढले.

Web Title: The risk of floods increased in Sangli, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर