लसीकरण केंद्रांवरच गर्दीतून कोरोना फैलावण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:26 AM2021-04-27T04:26:58+5:302021-04-27T04:26:58+5:30

शीतल पाटील, संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची लस टोचून घेण्यासाठी शहरातील आरोग्य केंद्रांवर झुंबड उडाली आहे. ...

Risk of spreading corona from crowds at vaccination centers only | लसीकरण केंद्रांवरच गर्दीतून कोरोना फैलावण्याचा धोका

लसीकरण केंद्रांवरच गर्दीतून कोरोना फैलावण्याचा धोका

Next

शीतल पाटील, संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाची लस टोचून घेण्यासाठी शहरातील आरोग्य केंद्रांवर झुंबड उडाली आहे. आरोग्य विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असल्याचे विदारक चित्र सोमवारी ‌‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.

सर्रास केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून अनेकजण मास्कच न लावताच केंद्रावर आले होते. लसीच्या उपलब्धतेचे नियोजन नसल्याने दुपारी बारा वाजताच अनेकांना लसीविना माघारी पाठविण्यात येत होते.

८०-९० वर्षांच्या वृद्धांनी उन्हाचा तडाखा सोसत लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. लसीसाठी नातेवाईकांचे आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद सुरु होते. काही केंद्रांवर कोविड चाचणी व लसीकरण एकत्रितच सुरू होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची भीती होती. सकाळी आठपासूनच लसीकरणासाठी नागरिक आले होते. पण बारा वाजले तरी त्यांना लस मिळाली नव्हती. हनुमाननगर आरोग्य केंद्रात अकरा वाजताच लस संपल्याचे जाहीर करण्यात आले. अभयनगर केंद्रावर गेटमध्येच झोंबाझोंबी सुरू होती. कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अरेरावीची भाषाही वापरली जात होती. महापालिकेने लसीकरणाचे कसलेच नियोजन केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला ‘डोस’ देण्याची आवश्यकता आहे अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

कोट

तीन दिवसांपूर्वी लसीकरणासाठी नोंदणी केली होती, त्यावेळीही लस संपली होती. सोमवारी नव्याने नोंदणी करण्यास सांगितले. यापूर्वी नाव नोंद करून घेतले होते, त्याचे काय झाले? हेच कळेना. आता पुन्हा हेलपाटे मारावे लागणार आहेत.

- शिवाजी खांडेकर

कोट

आज दुसऱ्या डोससाठी आलो आहे. सकाळी नऊ वाजता नंबर लावला आहे. अकरा वाजले तरी नंबर आला नाही. नव्याने येणाऱ्यांची नोंदणी बंद केली आहे. दुपारपर्यंत डोससाठी थांबावे लागेल असे आरोग्य कर्मचारी सांगत आहेत.

- श्रीधर जाधव

कोट

पहिल्या डोससाठी तीन-चार दिवसांपासून हेलपाटे मारत आहे. प्रत्येकवेळी गर्दी आणि लस संपल्याचे सांगून घरी पाठविले जाते. आजदेखील सकाळपासून रांगेत उभी आहे. आजही लस मिळण्याची खात्री नाही. लस संपल्याचे सांगत आहेत. - सुमन चौगुले

चौकट

अभयनगरला पोलीस दाखल

अभयनगरच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती. त्यात वादावादीचे प्रकार सुरू झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दोघा पोलिसांनी नागरिकांना रांगेची शिस्त लावली. केंद्राचे गेटही बंद करण्यात आले. पण पुन्हा सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत झोंबाझोंबी सुरू झाली.

चौकट

सावलीसाठी मंडप नाहीच

लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन आरोग्य केंद्रावर मंडप घालण्यात आला आहे. पण अनेक केंद्रावर हा मंडप अगदीच छोटा आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हातच उभे रहावे लागते. त्यांना आजूबाजूच्या झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागत आहे. तर काहीजण नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत बसून लसीकरणाची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसत होते.

चौकट

लस संपल्याचे फलक

हनुमाननगर येथील आरोग्य केंद्रावर कोरोनाची लस संपल्याचा फलकच लावण्यात आला आहे. चौकशीसाठी पुन्हा सकाळी दहा वाजता येण्याची सूचनाही नागरिकांना देण्यात येत होती. त्यामुळे अकरानंतर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना पुन्हा घरी पाठविले जात होते. सोमवारी केवळ २०० जणांचेच लसीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले. उद्याच्या लसीबाबत आताच स्पष्टपणे सांगता येत नाही, असेही कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात होते.

चौकट

लसीकरण- चाचणी एकाच छताखाली

शामरावनगर येथील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होती. केंद्राच्या आवारात कोरोना चाचणी व लसीकरण एकाच छताखाली केले जात होते. लसीकरणासाठी आलेले नागरिक एका बाजूला तर चाचणीसाठी आलेले नागरिक दुसऱ्या बाजूला असे चित्र होते. या दोन्हीमध्ये केवळ एक दोरी बांधण्यात आली होती.

चौकट

वडर कॉलनीमध्ये अकरा वाजले तरी लसीकरणाची तयारी झालेली नव्हती. नागरिकांसाठी खुर्च्या मांडण्याचे काम सुरु होते. लसीकरणासाठी नोंंदणीही सुरु होती. नोंदणी कोठे, लस टोचणार कोठे आणि सामान्य रुग्णांनी जायचे कोठे यांचे कोणतेच मार्गदर्शन नव्हते. गर्दी मात्र वाढतच होती.

Web Title: Risk of spreading corona from crowds at vaccination centers only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.