नेत्यांसाठी चकाचक रस्ते, सांगलीकर खड्ड्यातच!

By admin | Published: May 22, 2014 12:38 AM2014-05-22T00:38:28+5:302014-05-23T17:41:58+5:30

महापालिकेचा कारभार : नगरसेवकांत नाराजीचा सूर, तिन्ही शहरातील नागरिकांच्या नशिबी फक्त प्रतीक्षा

Road to the leaders, the Sangli khada only! | नेत्यांसाठी चकाचक रस्ते, सांगलीकर खड्ड्यातच!

नेत्यांसाठी चकाचक रस्ते, सांगलीकर खड्ड्यातच!

Next

 सांगली : महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने आपल्या नेत्यांसाठी नेहमीच ‘रेड कार्पेट’ अंथरले आहे. त्याचा आणखी एक अनुभव सांगलीकरांना येत आहे. एकीकडे शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असताना, सत्ताधारी नेत्यांच्या समारंभासाठी काही निवडक रस्ते मात्र चकाचक होत आहेत. या प्रकारामुळे जनतेत नाराजीचा सूर उमटू लागल्याची चर्चा सत्ताधारी नगरसेवकच खासगीत करीत आहेत. महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. गेल्या अकरा महिन्यांत शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही. सुरुवातीला पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाईपलाईनसाठी रस्त्यांची खुदाई केली. त्यानंतर मोबाईल कंपन्यांची त्यात भर पडली. अशातच ड्रेनेज योजनेचे कामही सुरू झाले. परिणामी शहरातील सर्वच रस्ते खोदले गेले. मुख्य बाजारपेठेपासून उपनगरांतील रस्त्यांपर्यंत सार्‍याचठिकाणी खड्डे पडले आहेत. चरी खोदल्या आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्याची आवश्यकता होती. विविध शासकीय निधीतून सुमारे ६० कोटींचे अनुदानही मिळाले होते, पण सत्ताधार्‍यांतील बेबनाव, कुरघोड्यांच्या राजकारणामुळे निविदा प्रक्रिया लांबणीवर गेली. आचारसंहितेपूर्वी घाईगडबडीत या कामांच्या निविदा काढण्यात आल्या; पण त्यानंतरची प्रक्रिया आचारसंहितेत अडकली. आता निविदा उघडून कामाची वर्कआॅर्डर देण्याचे काम सुरू झाले आहे, परंतु त्यातही वादविवाद होत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते मदन पाटील यांना महापालिकेत बैठक घेऊन अधिकार्‍यांची कानउघाडणी करावी लागली. दुसरीकडे मात्र सांगली-मिरज रस्त्यावरील मदन पाटील यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्याचे डांबरीकरण दोनच दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणाकडे जाणारा रस्ताही चकाचक झाला आहे. अगदी शंभरफुटी रस्त्यापर्यंत त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. शहरातील अन्य एकाही रस्त्याचे काम सुरू नसताना, नेत्यांसाठी मात्र रस्ते डांबरी होऊ लागले आहेत. आपल्या भागातील रस्ते कधी होणार, इतर ठिकाणी कामे कशी सुरू आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती जनतेतून नगरसेवकांवर होऊ लागली आहे. त्याला सत्ताधारी नगरसेवकही अपवाद राहिलेले नाहीत. तातडीने प्रभागातील कामे सुरू करावीत, जनतेतून नेत्यांबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे, अशी चर्चाही ते खासगीत करीत आहेत. (प्रतिनिधी) दहा कोटींची वर्कआॅर्डर महापालिकेने सुमारे ६० कोटींच्या विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. आचारसंहितेमुळे या कामांना सुरुवात होऊ शकली नाही. त्यापैकी आता केवळ गुंठेवारीतील १० कोटींच्या कामांच्या वर्कआॅर्डर देण्यात आल्या आहेत. उर्वरित कामांची मंजुरी, समन्स व वर्कआॅर्डरचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी होतील की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे निविदा प्रक्रियेत अडकली असताना, सांगली-मिरज रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम विनानिविदा सुरू असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. या कामाचे अंदाजपत्रकच तयार करण्यात आले नसल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात या कामाच्या मंजुरीवरून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Road to the leaders, the Sangli khada only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.