मिरजेत १५ दिवसांपूर्वी केलेला रस्ता गॅसवाहिनीसाठी पुन्हा खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:23+5:302021-03-27T04:27:23+5:30
मिरज : मिरजेत १५ दिवसांपूर्वी नवीन केलेला रस्ता गॅसवाहिनीसाठी ठेकेदाराकडून खोदण्यात येत आहे. महापालिका अधिकारी व गॅस ...
मिरज : मिरजेत १५ दिवसांपूर्वी नवीन केलेला रस्ता गॅसवाहिनीसाठी ठेकेदाराकडून खोदण्यात येत आहे. महापालिका अधिकारी व गॅस कंपनीत समन्वयाअभावी नुकत्याच केलेल्या रस्त्यावरच खोदाईची परवानगी ठेकेदाराला देण्यात आली आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.
मिरजेतील रमा उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे १५ दिवसांपूर्वी नवीन डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर गॅसवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा खोदण्यात आल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणावर झालेला खर्च वाया गेला आहे. गॅसवाहिनीसाठी ऑक्टोबर महिन्यात हा रस्ता खोदण्याची परवानगी महापालिकेने ठेकेदारास दिली होती. मात्र, गॅसवाहिनी बसविण्यापूर्वीच १५ दिवसांपूर्वी नवीन रस्ता करण्यात आला. महापालिका अधिकाऱ्यांना या रस्त्यावर खोदकामाची परवानगी दिल्याचे माहिती असतानाही रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर, आता गॅसवाहिनी बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी अमृत योजनेतून पाणी कनेक्शन देण्यासाठी डांबरीकरण झालेले नवीन रस्ते खोदण्यात येत असून याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. मिरजेत अनेक वर्षांनंतर रस्ते होत आहेत. मात्र, डांबरीकरण झालेले रस्ते वेगवेगळ्या कारणांवरून पुन्हा खोदण्यात येत असल्याने महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.