माेबाईल, इंटरनेट सेवेसाठी साेमवारी शेडगेवाडीत रास्ता राेकाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:30 AM2021-01-08T05:30:40+5:302021-01-08T05:30:40+5:30
कोकरूड : शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगर वस्तीने वसलेला असल्याने मोबाईल सेवेसह इंटरनेट सुविधांची वानवा आहे. रेंज मिळत ...
कोकरूड : शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगर वस्तीने वसलेला असल्याने मोबाईल सेवेसह इंटरनेट सुविधांची वानवा आहे. रेंज मिळत नसल्याने शेडगेवाडी येथे सर्व माेबाईल कंपन्यांच्या विरोधात मनसेसह व्यापाऱ्यांनी सोमवारी (दि ११) रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत शिराळा येथे तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अरोशी सिंग उपस्थित हाेत्या.
निवेदनात म्हटले आहे की, शिराळा पश्चिम भागातील कोकरूड, शेडगेवाडी, चरण, आरळा या प्रमुख बाजारपेठा असून, परिसरात व्यापारासह मोठमोठे उद्योग व्यावसाय उभे केले आहेत. त्यातच हा परिसर पूर्ण डोंगरी असल्याने इंटरनेटची अवस्था वाईट आहे. याचा फटका व्यापारासह शिक्षण, शासकीय योजना, दाखले, बँका, पतसंस्थांचे कारभार यांना होत असल्याने सर्व कामे ठप्प होत आहेत. या ठिकाणी राहत असलेले लोक व व्यावसाय करणारे व्यापारी व ग्राहक इंटरनेट सुविधा चालत नसल्यामुळे हैराण आहेत. शासनाने कोरोनाच्या काळात सर्व शासकीय सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे इथे इंटरनेट चालत नाही. व्यापाऱ्यांना मालाचे पैसे ऑनलाईन पाठविता येत नाहीत. शिवाय शिक्षण ही ऑनलाईन सुरू आहे. इंटरनेट चालत नसल्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत.
इंटरनेट सुविधा सुरळीत करावी, अन्यथा सोमवारी (दि ११) मनसेच्यावतीने तीर्व आंदोलनाचा इशारा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
फोटो : ०७ काेकरुड १
ओळ : इंटरनेट सुविधेसाठी शिराळा येथे तहसीलदार गणेश शिंदे यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अरोशी सिंग उपस्थित हाेत्या.