ऊस दराच्या आंदोलनात मनसे रस्त्यावर उतरणार
By admin | Published: November 6, 2014 10:30 PM2014-11-06T22:30:38+5:302014-11-06T23:01:47+5:30
मुंबईत बैठक : रघुनाथ पाटील- राज ठाकरे भेटीत निर्वाळा
इस्लामपूर : शेतकरी संघटनेच्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्वाळा मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी मुंबईतून भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आज सकाळी ११ वाजता मुंबई (दादर) येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ठाकरे व शेतकरी संघटनेचे नेते व देशव्यापी ‘सिफा’ संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची भेट झाली. जवळपास तासभर चाललेल्या या भेटीतील चर्चेत राज ठाकरे यांना पाटील यांनी राज्यातील साखर कारखानदारी, उसाची शेती आणि ऊसदराचे आंदोलन याची सविस्तर माहिती दिली. उसाचा प्रतिएकरी व प्रतिटन उत्पादन खर्च, शासनाकडून प्रतिटन आकारण्यात येणारा कर, कारखान्यातील उपपदार्थ निर्मिती, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट, झोनबंदी, मोलॅसिसवरील बंदी, साखरेचा विनियोग अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे यांनी तपशीलवार माहिती घेतली.
राज ठाकरे यांनी राज्यातील साखरसम्राट व शासनाकडून होणाऱ्या अन्यायाबाबत संताप व्यक्त करुन दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकली पाहिजे तसेच झोनबंदीचाही निकाल लागणे गरजेचे आहे. शासनाची व कारखानदारांची निमंत्रणे झुगारुन दिली पाहिजेत. उत्पादीत होणाऱ्या साखरेपैकी २0 टक्के साखर जनतेसाठी तर ८0 टक्के साखर बड्या उद्योगांकडे जाते. मग उसाला चांगला आणि योग्य भाव मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुमारे तासाभराच्या या बैठकीत ठाकरे यांनी यंदाच्या ऊसदर आंदोलनात शेतकरी संघटनेच्या बरोबरीने मनसे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात रस्त्यावर उतरेल, असेही त्यांनी सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले. या चर्चेवेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कार्यालयीन चिटणीस विनायक अभ्यंकर, मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोतरे, कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले उपस्थित होते. (वार्ताहर)
वसगडेच्या कार्यक्रमाला राज ठाकरे येणार
येत्या ११ नोव्हेंबर रोजी वसगडे (जि. सांगली) येथे ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराने धारातिर्थी पडलेल्या चंद्रकांत नलवडे यांच्या स्मृतिदिनी होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेला उपस्थित राहण्याचेही राज ठाकरे यांनी मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले.
दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकली पाहिजे तसेच झोनबंदीचाही निकाल लागणे गरजेचे आहे.
ऊसाला योग्य दर दिलाच पाहिजे