कोरोनामुळे मिरज पूर्व भागातील कर्नाटकला जोडणारे रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:40+5:302021-03-26T04:26:40+5:30
मिरज : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटक प्रशासनाने ...
मिरज : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटक प्रशासनाने सीमेवरील सर्व रस्ते बंद केले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या चार दिवसांत मिरज पूर्व भागातील कर्नाटक राज्याला जोडणारे मिरज - मंगसुळी, शिंदेवाडी - केंपवाड, खटाव - मदभावी, जानराववाडी - मदभावी हे सर्वच रस्ते खोदून, बांध घालून, काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आले आहेत. मिरज - कागवाड व बेडग - मंगसुळी रस्त्यावर चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली असून, तेथे प्रवाशांची कोरोना तपासणी करून सोडण्यात येत आहे. मिरज - कागवाड रस्त्यावर चेकपोस्टवर रोखण्यात येत असल्याने अनेक प्रवासी कागवाडमार्गे न जाता मिरज - मंगसुळी, शिंदेवाडी - केंपवाड, खटाव - मदभावी, जानराववाडी - मदभावी मार्गाने जात असल्याने हे रस्तेही आता बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर या रस्त्यावर मातीचा व दगडाचा बांध घालून काटेरी झुडपांच्या फांद्या टाकून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना तपासणी करून जावे लागत आहे. ग्रामीण भागातील सर्व रस्ते बंद केल्याने दररोज सीमाभागातून येजा करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. शेतकरी काही ठिकाणी चोरवाटांनी ये-जा करीत आहेत. कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने कागवाड सीमेवर आरटीपीसीआर तपासणीची सोय करण्यात आली असून, महाराष्ट्रातून बसमधून येणाऱ्या प्रवाशांनाही सोडण्यात येत आहे.