संजयनगरचा डॉन असल्याचे सांगत रिक्षाचालकाला लुटले; सांगलीतील घटना

By शरद जाधव | Published: July 30, 2023 06:49 PM2023-07-30T18:49:21+5:302023-07-30T18:49:37+5:30

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

Robbed a rickshaw puller claiming to be a Sanjaynagar don incident in Sangli | संजयनगरचा डॉन असल्याचे सांगत रिक्षाचालकाला लुटले; सांगलीतील घटना

संजयनगरचा डॉन असल्याचे सांगत रिक्षाचालकाला लुटले; सांगलीतील घटना

googlenewsNext

सांगली : शहरातील लव्हली सर्कल परिसरात ‘मला ओळखत नाहीस का, मी या संजयनगरचा डॉन आहे’ अशी धमकी देत रिक्षाचालकाला मारहाण करून लुटण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तानाजी गणपती कोळपे (रा. अष्टविनायकनगर, कुपवाड) यांनी आनंद बसवराज इंगळे (वय २७, रा. राजीवनगर, सांगली), लाल्या, आज्या (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. २९ रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी कोळपे हे रिक्षाचालक आहेत. शनिवारी ते सांगलीतील बसस्थानक परिसरातून इंगळे याला घेऊन शिंदे मळामार्गे लक्ष्मी मंदिर चौकाकडे सोडण्यासाठी जात होते. लव्हली सर्कलच्या पुढे ते आल्यानंतर संशयित इंगळे याने कोळपे यांना पाठीमागून चाकू लावून रिक्षा बाजूला घे नाहीतर तुला ठार मारून टाकीन, तू मला ओळखत नाहीस काय, मी आनंद इंगळे या संजयनगरचा डॉन आहे, मला आता पैसे दे, असे म्हणाला. यानंतर कोळपे यांनी रिक्षा बाजूला घेतली. यानंतर त्यांच्या खिशातील मोबाइल व ७२० रुपयांची रोकड त्याने जबरदस्तीने काढून घेतली. 

यानंतर कोळपे यांची रिक्षा घेऊन तो पळून जात असतानाच, लव्हली सर्कलजवळ तो खांबाला धडकला. यात २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यानंतर त्याने त्याचे साथीदार लाल्या व आज्या यांना बोलावून घेत कोळपे व त्यांचा भाचा आकाश गोयकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

 


 
 

Web Title: Robbed a rickshaw puller claiming to be a Sanjaynagar don incident in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.