सांगलीत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून जिल्हा बँकेचे 25 लाख लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 03:19 PM2019-06-14T15:19:53+5:302019-06-14T15:22:38+5:30

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) अधिकारी, कर्मचारी तासगावात दाखल झाले आहेत.

robbers loot rs 25 lakh from sangli district bank employees | सांगलीत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून जिल्हा बँकेचे 25 लाख लुटले

सांगलीत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून जिल्हा बँकेचे 25 लाख लुटले

Next

सांगली : तासगाव-विसापूर रस्त्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची 25 लाखाची रोकड चार चोरट्यांनी लुटली. बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करीत चोरट्यांनी हे कृत्य केले. आज (शुक्रवारी) दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रक्कम चोरल्यानंतर चोरटे ढवळी (ता. तासगाव) गावाच्या दिशेने पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. विविध भागात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) अधिकारी, कर्मचारी तासगावात दाखल झाले आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी दुचाकीवरून तासगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शाखेत पैसे नेण्यासाठी आले होते. तासगाव शाखेतून या कर्मचाऱ्यांनी 25 लाखांची रोकड घेतली. ही रोकड बॅगमध्ये घेऊन दोघेजण दुचाकीवरून विसापूरकडे निघाले होते. 

दरम्यान, चोरटे या दोघांच्या पाळतीवर असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे कर्मचारी तासगावातून विसापूरकडे जात असताना चोरट्यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केल्याचे समोर येत आहे. दोन दुचाकीवरून चौघा चोरट्यांनी पाठलाग करून तासगाव - विसापूर रस्त्यावर कॅनॉलजवळ बँक कर्मचाऱ्यांना अडवले. त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली. त्यांना मारहाण केली. त्यांच्या हातातील 25 लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. यानंतर अवघ्या काही मिनिटात चोरटे ढवळीच्या दिशेने पसार झाले.

या घटनेची बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तासगावात दाखल झाली आहे. या घटनेनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

Web Title: robbers loot rs 25 lakh from sangli district bank employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.