वाटेगावमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:26 AM2021-05-10T04:26:59+5:302021-05-10T04:26:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कासेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे दरोड्याच्या उद्देशाने, संशयास्पदरित्या रात्रीच्या वेळी थांबलेल्या पाच जणांच्या सराईत टोळीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे दरोड्याच्या उद्देशाने, संशयास्पदरित्या रात्रीच्या वेळी थांबलेल्या पाच जणांच्या सराईत टोळीस कासेगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन दुचाकी व चोरी करण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. यातील संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरोफोडी, मारामारी आदी प्रकारचे १२ गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता करण्यात आली.
सुरज जयवंत चव्हाण (वय २५, रा. वाटेगाव) निरंजन ऊर्फ चॉकलेट फुलचंद मानकर (वय २१ रा.उंब्रज ता. कराड), प्रथमेश सागर माळी (वय २१ रा. मंगळवार पेठ कोल्हापूर), सौरभ लक्ष्मण जगताप (वय २१ रा. मंगळवार पेठ कोल्हापूर), बापू पवार ऊर्फ रामचंद्र आनंदा वडर (वय ३० रा. अत्रीबुद्रुक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शनिवार, ८ रोजी रात्री एकच्या दरम्यान कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते व पोलीस कर्मचारी गस्तीसाठी वाटेगाता येथे निघाले होते. वाटेगाव येथील वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ पाच जण संशयितरित्या थांबलेले होते. त्यांच्याकडे दोन दुचाकी होत्या. यावेळी पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने ते त्याच्याजवळ गेले. दरम्यान, त्यातील एक जण पळून गेला. पोलीस व होमगार्ड यांनी तात्काळ उर्वरित चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, चाकू, गज, कठावणी, काठ्या, मिरची पूड पोलिसांनी हस्तगत केली. तर पळून गेलेला बापू वडर यास इस्लामपूर येथून कासेगाव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सर्व संशयित आरोपींना इस्लामपूर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.