कामगार विमा मंडळाकडून लूट
By admin | Published: March 2, 2016 11:38 PM2016-03-02T23:38:46+5:302016-03-02T23:53:57+5:30
सतीश मालू : मिशन, भारती रुग्णालयांशी करार करण्याची मागणी
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीसह लगतच्या औद्योगिक क्षेत्रातून राज्य कामगार विमा महामंडळ (इएसआयसी) महिन्याला एक कोटीहून अधिक रकमेची वसुली करते. त्याप्रमाणात कामगार व आस्थापनांना सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे हे महामंडळ म्हणजे केवळ लूटमार कंपनी बनली असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांनी आता मिशन आणि भारती हॉस्पिटलमधून मेडिकल सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले.
कामगार विमा महामंडळाच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त चेंबरच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘ओपन हाऊस सुविधा समागम’ या उपक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कृष्णा व्हॅली चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजीराव पाटील, सचिव चंद्रकांत पाटील, राज्य कामगार विमा महामंडळाचे उपसंचालक निश्चलकुमार नाग, उपसंचालक पी. जी. कांबळे प्रमुख उपस्थित होते.
मालू म्हणाले की, सद्य:स्थितीत उद्योगाशी निगडीत सर्व विभागांचे धोरण बदलले आहे, मात्र कामगार विमा महामंडळाचा दृष्टिकोन अजूनही बदलला नाही. कामगारांच्या जिवावर पगार मिळतो. त्या कामगारांना महामंडळाच्या रुग्णालयात गेल्यावर वाईट वागणूक मिळते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यपध्दती बदलावी.
शिवाजीराव पाटील म्हणाले की, महामंंडळाने हुकूमशाहीचे धोरण बंद करावे. कामगारांकडून उपचारापूर्वी पैसे घेतले जातात. मंडळाने प्रथम खासगी रुग्णालयांशी झालेले करार रद्द करावेत. त्यांनी मिशन किंवा भारतीरुग्णालयाशी करार करावेत. यापूर्वी पैसे न दिल्यामुळे करार रद्द झाला, ही मंडळाची चूक होती. त्यांनी पैसे वेळेवर दिले असते, तर मिशन रुग्णालयाने स्वत:हून त्यांच्याशी संपर्क साधला असता. चेंबरचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी त्वरित कुपवाड एमआयडीसीमध्ये बाह्यरु ग्णविभाग (ओपीडी) सुरू करण्याची मागणी केली. मंडळाचे उपसंचालक नाग व कांबळे यांनी मंडळाने दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात केली असल्याचे मत व्यक्त केले.
आर. आय. इनामदार, जावेद मणेर, सदाशिव साखरे यांनीही नाराजी व्यक्त केली. इएसआयसी सांगलीचे व्यवस्थापक रामकरण यांनी स्वागत केले. कृष्णा व्हॅलीचे व्यवस्थापक बी. एस. सूर्यवंशी यांनी आभार मानले. सुंदरलाल, हरिभाऊ गुरव, अॅड. गणेश पाटील, दीपक पाटील, अमित पाटील, दत्ता लोकरे, सचिन गोंधळे, बी. एम. इनामदार उपस्थित होते. (वार्ताहर)
ओपीडीबाबत दिशाभूल
कृष्णा व्हॅली चेंबरने कुपवाडमधून मिरजेला स्थलांतरित करण्यात आलेली इएसआयसीची ओपीडी एमआयडीसीमध्ये सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत उद्योजकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही जागा योग्य नसल्याचे अभिप्राय पाठविल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर चेंबर आणि उद्योजकांनी नाराजी व्यक्त करून उच्च अधिकाऱ्यांसमोरच दिशाभूल कशी करता, असा सवाल उपस्थित केला. यावेळी नाग यांनी त्वरित अनुकूल अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.