आष्ट्याजवळ बॅँक अधिकाऱ्याला लुटले
By Admin | Published: February 7, 2016 01:01 AM2016-02-07T01:01:48+5:302016-02-07T01:01:48+5:30
९१ हजारांचा ऐवज लंपास : ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने कृत्य
आष्टा : अपना बॅँकेच्या सांगली शाखेचे शाखाधिकारी उमेश गंगाराम घागरे (वय ४५, सध्या रा. श्रीशैल्य अपार्टमेंट, आरवाडे हायस्कूलसमोर, सांगली, मूळ गाव जोतिबा फुले रोड, नायगाव, दादर ईस्ट, मुंबई) यांना शुक्रवारी रात्री ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने आष्ट्याजवळ लुटण्यात आले. त्यांच्याकडील ७० हजाराची रक्कम, दोन अंगठ्या व टायटन घड्याळ असा ९१ हजारांचा ऐवज जीपमधील चौघांनी मारहाण करून लंपास केला.
उमेश घागरे अपना बॅँकेच्या सांगली शाखत सुमारे दहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. ते दर आठवड्याला विटा, कुंडल येथील बॅँकेच्या शाखांना भेटी देत असतात. त्यावेळी या शाखांमधून सुमारे ४० ते ५० हजाराची रोख रक्कम सांगलीला नेत असतात. शुक्रवारी दुपारी एक वाजता ते आष्टा शाखेत आले होते. तेथून त्यांनी ७० हजाराची रक्कम घेतली. आष्ट्यातील काम संपल्यानंतर शिपाई संजय कारंडे यांना घेऊन मोटारसायकलवरून विटा, कुंडल, पलूस येथील बॅँकेच्या शाखांमध्ये गेले. तेथील काम झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता ते पुन्हा आष्टा येथे आले. रात्री आठच्या दरम्यान ते संजय कोळी, संजय कारंडे यांना घेऊन आष्टा-बागणी रस्त्यावरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. जेवणानंतर आष्टा बसस्थानक चौकात आले. तेथे दोघांनी घागरे यांना सोडले. घागरे बसची वाट पाहात असताना रात्री दहाच्या सुमारास इस्लामपूरकडून जीप आली. ती त्यांनी थांबवली. जीपमध्ये महिलेसह चौघेजण होते. जीपचालकाला सांगलीस नेण्याची विनंती केल्यानंतर त्यांना गाडीत घेण्यात आले.
थोड्या अंतरावर गेल्यावर गाडीतील दोघांनी त्यांना मारहाण सुरू केली. त्यांच्याकडील मोबाईलसह रोख ७० हजार रुपये, सोन्याच्या २० हजाराच्या दोन अंगठ्या, टायटनचे घड्याळ असा ९१ हजारांचा ऐवज काढून घेतला. मोबाईलमधील बॅटरी काढून मोबाईल परत दिला. घागरे यांचा चेहरा रुमालाने बांधून गाडी वळवून त्यांना मोकळ्या शेतात नेऊन सोडण्यात आले व जीपमधील सर्वजण निघून गेले. घागरे यांनी त्यांचा पाठलाग केला असता एमएच २७ एवढाच क्रमांक दिसून आला. जीपचालकासह तिघे ४० ते ४५ वयाच्या दरम्यानचे होते.