शिराळा पश्चिम भागात खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:31+5:302021-05-25T04:30:31+5:30
कोकरुड : जिल्हाबंदी असतानाही शिराळा पश्चिम भागातून मुंबईला प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी आरामबस चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. प्रवास ...
कोकरुड : जिल्हाबंदी असतानाही शिराळा पश्चिम भागातून मुंबईला प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी आरामबस चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोगस चाचणी प्रमाणपत्र मिळत आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली आणि मलकापूर (ता. शाहूवाडी) येथून लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी असतानाही दररोज वेगवेगळ्या कंपन्यांच्या दहा ते बारा खासगी आरामबस भरून मुंबईकडे जात आहेत. चांदोली, मलकापूरहून सुटणाऱ्या खासगी आरामबस मलकापूर, कोकरुड, मेणीफाटा, येळगाव फाटा, पाचवड फाटा येथे नाकाबंदी असतानाही भरून जात आहेत. कोरोना काळात प्रवाशांची वाहतूक मर्यादा आहे. डबलसीटच्या जागेवर एकजणच बसविणे गरजेचे असतानाही नियमाला फाटा देत दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकत्र बसविले जात आहे.
सध्या मुंबईसाठी प्रत्येकी ८०० रुपये प्रवास भाडे घेत पंचवीस प्रवाशांऐवजी पंचावन्न प्रवासी भरले जात आहेत. शिराळा पश्चिम भागातून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून गावी येणाऱ्या लोकांची संख्या दररोज हजारावर आहे.
चौकट
आरटीओचे दुर्लक्ष
बोगस चाचणी होत असल्याने या प्रवाशांमुळे तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. याकडे सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथील प्रादेशिक वाहतूक अधिकारी (आरटीओ) दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे.