कुंभारी येथे तीन घरांवर दरोडा, चार लाख ३५ हजाराचा मुद्देमाल रोख रकमेसह लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:08 PM2019-06-03T14:08:36+5:302019-06-03T14:09:52+5:30
जत : कुंभारी (ता. जत) येथील नानासाहेब तुकाराम जाधव (वय ४०) यांच्यासह इतर दोन घरांवर चोरट्यांनी दरोडा टाकून चार ...
जत : कुंभारी (ता. जत) येथील नानासाहेब तुकाराम जाधव (वय ४०) यांच्यासह इतर दोन घरांवर चोरट्यांनी दरोडा टाकून चार लाख ३५ हजाराचा मुद्देमाल रोख रकमेसह लंपास केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी नानासाहेब जाधव यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली. एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे कुंभारी गावात व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
कुंभारी ते बागेवाडी रस्त्यावर कुंभारीपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर नानासाहेब तुकाराम जाधव यांचे धाब्याचे घर आहे. येथे ते आई, पत्नी, दोन मुली व मुलगा यांच्यासमवेत राहतात. शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर घराच्या मुख्य दरवाजाला कडी घालून सर्व कुटुंबीय अंगणात झोपले होते.
चोरट्यांनी मध्यरात्रीच्यादरम्यान घराची कडी काढून घरातील खुंटीला लावलेली चावी घेऊन कपाटातील रोख २२ हजार आठशे रुपये, सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, गंठण, अंगठ्या, रिंगा, नाकातील खडा, नथ व चांदीचे ताट, तांब्या, गणेश मूर्ती असा पाचशे ग्राम मुद्देमाल लंपास केला.
नानासाहेब जाधव यांना पहाटे जाग आल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी चोरीसंदर्भात पोलिसांना माहिती दिली.
चोरटे दुचाकी किंवा चारचाकी वाहनातून येऊन मुख्य रस्त्यावर वाहन लावून तेथून चोरी करून ते पसार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूचे ठसे ठसे तज्ज्ञांनी घेतले. या घरफोडीचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गुंडरे करत आहेत.