आंध्र प्रदेशातील सोन्याच्या दुकानात पावणेतीन कोटीचा दरोडा, सांगलीतील कुर्लीच्या कामगाराचे साथीदारांसह कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 05:31 PM2023-09-14T17:31:51+5:302023-09-14T17:32:20+5:30

व्यावसायिकाच्या पत्नी, मुलांचे हात-पाय बांधून चाकूचा धाक दाखविला

Robbery worth Rs 3 crore at a gold shop in Andhra Pradesh, committed by a worker of Kurli in Sangli along with his accomplices | आंध्र प्रदेशातील सोन्याच्या दुकानात पावणेतीन कोटीचा दरोडा, सांगलीतील कुर्लीच्या कामगाराचे साथीदारांसह कृत्य

आंध्र प्रदेशातील सोन्याच्या दुकानात पावणेतीन कोटीचा दरोडा, सांगलीतील कुर्लीच्या कामगाराचे साथीदारांसह कृत्य

googlenewsNext

विटा : आंध्र प्रदेशातील तनुकू शहरात सोने-चांदी व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या सांगली जिल्ह्यातील वेजेगाव (ता. खानापूर) येथील नामदेव गुरुनाथ देवकर यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलांचे हात-पाय बांधून चाकूचा धाक दाखवित त्यांच्याच दुकानातील कामगार सूरज बळवंत कुंभार (रा. कुर्ली, ता. खानापूर, सध्या रा. तनुकू, आंध्र प्रदेश) याने सुमारे २ कोटी ७५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास तनुकू (आंध्र प्रदेश) येथे घडली. याप्रकरणी संशयित कामगार सूरज कुंभार यांच्यासह अन्य चाैघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

वेजेगाव येथील गुरुनाथ देवकर यांचे आंध्र प्रदेशातील तनुकू शहरात सोने-चांदीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सध्या त्यांचे पुत्र नामदेव चालवितात. ते पत्नी व मुलांसह तनुकू येथे राहण्यास आहेत. त्यांच्या दुकानातच गेल्या तीन ते चार वर्षापासून कुर्ली (ता. खानापूर) येथील सूरज कुंभार हा कामगार काम करीत होता.

मंगळवारी दुकानाला सुट्टी असल्याने मालक नामदेव देवकर हे पत्नी व मुलांसमवेत घरी होते. त्याचवेळी तेथे सूरज कुंभार हा अन्य त्याच्या चार साथीदारांना घेऊन आला. त्यावेळी कुंभार याने मालक देवकर यांचे पाठीमागून तोंड दाबून डोळे बंद केले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी देवकर पती-पत्नीच्या तोंडात कापडाचा बोळा घातला.

यावेळी देवकर यांना चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडून लोखंडी कपाटाच्या चाव्या घेतल्या. चोरट्यांनी कपाटाचे कुलूप काढून त्यातील नवीन व ग्राहकांचे गहाण ठेवण्यासाठी आलेले सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. या घटनेनंतर घाबरलेल्या देवकर पती-पत्नीने आपली सुटका करून घेत थेट तनुकू पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची नोंद तनुकू (आंध्र प्रदेश) पोलिसांत झाली आहे.

गलाई व्यावसायिकांमध्ये चिंता

गेल्या दीड महिन्यापूर्वी दिल्ली येथे घोटी बुद्रूकचे प्रताप महादेव जाधव या तरुण व्यावसायिकाचा कामगारानेच साथीदाराच्या मदतीने चाकूने भोसकून खून केला होता. ही घटना ताजी असतानाच आंध्र प्रदेशातील वेजेगावच्या व्यावसायिकाचे मराठी कामगारानेच चाकूचा धाक दाखवून सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले. त्यामुळे मराठी गलाई व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Robbery worth Rs 3 crore at a gold shop in Andhra Pradesh, committed by a worker of Kurli in Sangli along with his accomplices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.