Sangli: ‘रॉबिनहूड’ नाना मासाळ यांचा जीवनपट उलगडणार, इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:27 PM2023-08-11T18:27:58+5:302023-08-11T18:28:06+5:30

महेश देसाई शिरढोण : ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील नाना मासाळ या वीराची अज्ञात ...

Robinhood Nana Masal life story will be unfolded, the British were left behind | Sangli: ‘रॉबिनहूड’ नाना मासाळ यांचा जीवनपट उलगडणार, इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते

Sangli: ‘रॉबिनहूड’ नाना मासाळ यांचा जीवनपट उलगडणार, इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते

googlenewsNext

महेश देसाई

शिरढोण : ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील नाना मासाळ या वीराची अज्ञात कहाणी सांगणारी कागदपत्रे उजेडात आली आहेत. ब्रिटिश ज्यांना ‘रॉबिनहूड’ असे संबोधत होते अशा या वीराचा कुकटोळी गावात ग्रामपंचायतीसमोर शिलाफलक स्वातंत्र्यदिनी उभारला जाणार आहे; तसेच वारसदारदारांचा सन्मान होणार आहे.

मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी तत्कालीन गुप्तचर पोलिसांचे अहवाल, संस्थानांकडील कागदपत्रे यातून नाना मासाळ यांची माहिती संकलित केली आहे; तसेच वारसांकडूनही माहिती मिळविली आहे.

कुकटोळी गाव बुधगाव संस्थानात होते. नानांचे वडील विठू धनगर पैलवान होते. १८७० मध्ये नानांचा जन्म झाला. त्यांनाही तालमीचा शौक होता. गोफणीने अचूक शिकार करण्यात त्यांचा हातखंडा होता. बडोद्याचे क्रीडा अभ्यासक लक्ष्मण सप्रे यांनी गोफणकलेचं कौतुक केलं आहे.

नानांना सावकारांकडून गरिबांवर होणारा अत्याचार त्यांना पाहवला नाही. सन १९०० च्या सुमारास सहकाऱ्यांना घेऊन टोळी बनवली. बाळा वाणी पाटील त्यांचा उजवा हात होता. बंदुका मिळविल्या. बॉम्बचे प्रशिक्षण घेतले. विविध जिल्ह्यांत सावकारांवर दरोडे टाकले. त्यातील पैसा गरिबांना वाटला.

तत्कालीन गुप्तचर विभागाने टोळीची हकीकत मुंबई सरकारला कळविली. नानांनी परदेशी कापडाची व वस्तूंची होळी केली. स्वदेशीचा जागर केला. गावातील तंटे नाना आणि बाळा पाटील यांनी मिटवले. टोळीच्या कारनाम्यांनी संस्थानी पोलिस आणि ब्रिटिश हादरले. पकडण्यासाठी बक्षिसे लावली. जंग-जंग पछाडले; मात्र नाना हाती लागत नव्हते. धनदांडग्यांना लुटून गरिबांना न्याय देणाऱ्या नानांना ब्रिटिश ‘रॉबिनहूड’ म्हणत.

पंचवीस वर्षे जेलची शिक्षा

१९०८ मध्ये टोळीतील काही सदस्यांना पकडले. नाना गुंगारा देत राहिले. ३ जून १९०९ मध्ये बसाप्पाचीवाडी येथे स्थानिकांनी फितुरी केल्यामुळे ते पकडले गेले. २२ जून १९०९ रोजी नानांचा सहकारी बाळा पाटील याला तांदुळवाडीत पकडले. नानांना विजापूरच्या तुरुंगात पाठविले. टोळीतील २८ सदस्यांना पकडले. कामगिरीबद्दल ११ पोलिसांना बढती आणि बक्षिसे मिळाली. नानांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जेल फोडतील या भीतीने येरवडा तुरुंगात पाठविले. तेथे २५ वर्षे होते. सन १९३१ मध्ये हॉटसनवर गोळ्या झाडणारे मिरजेचे क्रांतिकारक वासुदेव बळवंत गोगटे यांची भेट झाली. त्यांनी नानांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

Web Title: Robinhood Nana Masal life story will be unfolded, the British were left behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली