बोरगावच्या रोहित फार्णेंची नक्षली भागात उत्कृष्ट कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:23+5:302021-03-22T04:23:23+5:30
दुधगाव : वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील रोहित फार्णे यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली. ...
दुधगाव : वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील रोहित फार्णे यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करत सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.
रोहित हे शेतकरी कुटुंबात जन्मलेले. वडील रमेश फार्णे त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत रोहितने यश संपादन केले. २०१५ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची नियुक्ती झाली. २०१७ मध्ये त्यांची गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात नेमणूक झाली. त्यांनी अल्पावधीत चांगली कामगिरी करत नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ, अशी ओळख निर्माण केली.
नक्षलग्रस्त भागात आपल्या सहकाऱ्यांसह अभियान राबवत नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त केले. या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाकडून त्यांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती देण्यात आली. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांचे कौतुक केले.