रोहित पाटील की सुमनताई, याचा फैसला पक्षश्रेष्ठी घेतील; चर्चा विधानसभेची
By शीतल पाटील | Published: May 23, 2023 03:25 PM2023-05-23T15:25:26+5:302023-05-23T15:26:32+5:30
तलावात पाणी सोडण्यासाठी आठ दिवसाचा अल्टिमेटम
सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीत तासगाव -कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणार की सुमनताईंनाच पुन्हा संधी दिली जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या खुद्द सुमनताईंनीच हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीच घेतील, असे सांगत चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात ढकलला आहे. दरम्यान, तासगाव तालुक्यातील तलाव कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे. आठ दिवसात पाणी तलावात सोडले नाही तर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.
आमदार सुमनताई पाटील या राष्ट्रीय विधायक संमेलनाची माहिती देण्यासाठी सांगलीत आल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी पुढील निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळमधून रोहित पाटील यांना संधी मिळणार का? असा प्रश्न केला. त्यावर पाटील म्हणाल्या की, मी की रोहित याचा फैसला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच घेतील. दिवंगत आर. आर. पाटील यांनी सत्तेत असताना सर्वांनाच मदत केली. विरोधकांचीही कामे केली. पण आम्हाला तासगाव-कवठेमहांकाळच्या विकासासाठी झगडावे लागते. दोन महिन्यापासून मतदारसंघातील तलावात पाणी सोडावे, यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करीत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे पैसेही भरले आहेत. तरीही पाणी दिले जात नाही. येत्या आठ दिवसात तलावात पाणी सोडले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.